देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ आणि एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या देसाईगंज शहरात नेहमीच लोकांची वर्दळ राहते. येथील मुख्य चौकाचे सौंदर्यीकरण करत काही वर्षांपूर्वी चौकाच्या मध्यभागी फवारा (कारंजे) लावण्यात आला, पण सद्य:स्थितीत या चौकाचे सौंदर्यीकरण लोप पावले असून अस्वच्छता आणि अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. हा विळखा कधी सुटणार, असा प्रश्न देसाईगंजवासीय करत आहेत.
या नगरपरिषदेचे वार्षिक बजेट कोट्यवधी रुपयांचे आहे. या अंतर्गत लाखो रुपये खर्च करून शहराच्या मुख्य चौकात फवारा लावून सौंदर्यात भर घातली होती. यासाठी जुन्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर मोटारपंप बसवून सुशोभीकरण करण्यासाठी रंगीबिरंगी लाईटही लावले होते. मात्र, तो फवारा काही दिवस चालून बंद पडला. त्याकडे आता लक्ष देण्यासाठी कोणीही तयार नाही.
शहरात सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणात शासकीय बांधकामे, विद्युतीकरण करण्यावर भर दिला जात असला तरी शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या या चौकाला गतवैभव प्राप्त करून देणेही गरजेचे आहे, तसेच अतिक्रमणामुळे होणारी वाहतुकीची कोंडी सोडविणेही महत्त्वाचे आहे.
(बॉक्स)
लाखोंचा खर्च पाण्यात
या चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी नगर परिषदेने त्याकाळी लाखो रुपये खर्च केले होते, पण आता किरकोळ दुकानदारांनी सभोवताली दुकाने थाटून चौकच गिळंकृत केला आहे. दुकानातून निघणारा टाकाऊ कचरा दररोज त्या चौकातच पडून राहातो. त्यामुळे या चौकाचे सौंदर्यीकरण लोप पावले असून लाखो रुपयांचा खर्चही वाया गेला आहे.
230721\0145img_20210213_122938.jpg
शहरातील मध्यवर्ती भागातील फवारा चौक बंद चहूबाजूला अतिक्रमण