खासदारांचे आश्वासन : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरूवारी झाले मुंबईतून ई-भूमिपूजन; १०२ किमी अंतराचे होणार बांधकाम गडचिरोली : शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी ९५ कोटी ३१ लाख रूपये खर्चाच्या भूमीगत गटार योजनेला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. लवकरच या योजनेच्या कामाला सुरूवात होईल व वेळेत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेदरम्यान शुक्रवारी दिली आहे. भूमीगत गटार लाईनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरूवारी ई-भूमिपूजन करण्यात आले. भूमीगत गटार लाईनसाठी निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान दिले होते. हे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळत सहा महिन्यांच्या आतच भूमीगत गटार लाईन योजनेला मंजुरी दिली आहे. संपूर्ण गडचिरोली शहरात १०२ किमीची भूमीगत गटार लाईन निर्माण केली जाणार आहे. यासाठी ९५ कोटी ३१ लाख रूपयांचा खर्च येणार आहे. यापैकी १५ टक्के म्हणजे १४ कोटी २९ लाख रूपये स्वहिस्सा म्हणून नगर परिषदेला शासनाकडे जमा करावा लागणार आहे. नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे एवढा मोठा निधी उभा करणे नगर परिषदेला शक्य होणार नाही. विशेष शासनाने नगर परिषदेच्या हिस्स्याची अट रद्द करावी यासाठी नगर परिषदेने ठराव घेऊन तो जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने महाराष्ट्र शासनाकडे पाठवावा. आपण मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करू, अशी माहिती दिली. भूमिगत गटार योजनेच्या कामाला लवकरच सुरूवात केली जाईल. राज्य शासन या योजनेला निधीची कमतरता पडू देणार नाही. त्यामुळे अगदी वेळेत योजना पूर्ण होईल. भूमिगत गटार झाल्यास गडचिरोली शहरातील सांडपाण्याचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागेल. अगदी वेळेत व दर्जात्मक काम केले जाईल, असे आश्वासन खासदारांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिले. पत्रकार परिषदेला आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, सुधाकर येनगंधलवार, रवींद्र ओल्लालवार, प्रकाश गेडाम, मुख्याधिकारी कृष्णा निपाने, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी) आठवडी बाजारासाठी तीन कोटींचा निधी आठवडी बाजाराचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे, ओटे तयार करणे व इतर सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून तीन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर आयटीआय-गोकुलनगर मार्गाच्या दुरूस्तीसाठी एक कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. बसस्थानकाजवळ असलेल्या तलावात बगिचा तयार केला जाणार आहे. यासाठीसुध्दा एक कोटी रूपये उपलब्ध झाले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी दिली.
गडचिरोली शहराची भूमिगत गटार योजना वेळेत पूर्ण होणार
By admin | Published: April 15, 2017 1:35 AM