लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : ऐन उमेदीच्या वयापासून नोकरी केल्यानंतर संसाराची घडी व्यवस्थित बसेल व आयुष्यभराचा प्रश्न सुटेल, या दिवास्वप्नापायी अनेकांनी आपली पोटाची भाकरी अर्थात जमीनजुमला मोडून दलालाकरवी संस्थेत नोकरी मिळविण्यासाठी आटापिटा केला. पण डोनेशन देऊनही नाेकरी न मिळाल्याने सुशिक्षित बेराेजगार हवालदिल झाले आहेत. शाळेत नाेकरी लावून देण्याच्या नावाखाली करोडोंची माया जमवत संस्थाचालक व दलाल देसाईगंज परिसरातून आता ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. मागील चार दशकांपासून नोकरीच्या नावाखाली लाखो रुपयांनी माया जमवून दलाल मालामाल होऊन बसले आहेत. आमच्या वेगवेगळ्या संस्था असल्याची बतावणी करून या संस्थेत मोठ्या प्रमाणात पदे निर्माण झाली आहेत. वरिष्ठ पदापासून तर कनिष्ठ पदापर्यंत जागा उपलब्ध आहेत, अशी बतावणी करण्यात आली. तसेच या पदासाठी लाखोंची डोनेशनची रक्कम ठरवून परिसरातील दलाल व काही निकटच्या व्यक्तींना हाताशी धरून व एखाद्या कमी खपाच्या साप्ताहिकात जाहिरात देण्यात आल्या. त्यातून या टीमने डोनेशनच्या लाखो रुपयांवर टक्केवारी घेतली.
‘लोकमत’च्या बातमीनंतर चुळबूळ सुरू देसाईगंज शहरातील एका संस्थेत डोनेशनच्या नावाखाली काही तरुणांनी संस्थाचालकांशी प्रत्यक्ष व काहींनी दलालामार्फत सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखाेची रक्कम ओतली. या बदल्यात या टीमने नोकरीचे नेमणूक पत्रही दिले. मात्र प्रत्यक्षात नाेकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे उमेदवारांच्या लक्षात आले. याबाबत ‘लोकमत’ने ८ जानेवारीच्या लावलेल्या बातमीनंतर शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली. हा संस्थापक, संस्थाचालक व दलाल कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फसवणूक झालेले अनेक तरुण, तरुणी आता त्या संस्थाचालक व दलालाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये व संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे तक्रार देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.