चामोर्शी शहरात तालुक्यातील शेकडो नागरिक विविध कामाकरिता येतात. अहेरी व सिरोंचाकडे जाणारा हा मार्ग असल्याने वाहनांची प्रचंड वर्दळ असते. सध्या शहरात उसाची रसवंती विक्री करणारे विक्रेते दिसून येत आहेत. शहरातील मुख्य मार्गावर, बस स्टॉप, जुन्या तहसील कार्यालयाजवळ, मुख्य बाजारपेठ परिसरात फिरून विक्री करणारे अनेक दुकाने लागली आहेत. यासह शहरातील वर्दळीच्या ठिकाणी हातगाडीद्वारे रसवंती (उसाचा रस ) विक्री केली जात आहे. तालुक्यात उस उपलब्ध होत नसल्याने चंद्रपूर येथून उसाची आयात हे विक्रेते करीत आहेत. सध्या दहा ते पंधरा रुपये ग्लास असा भाव आहे. ऊसाचा रस गुणकारी असल्याने रासायनिक घटक असलेले पेय पिण्यास नागरिक धजत नाही. उसाच्या रसवंतीसमोर ग्राहक दिवसभर दिसून येतात. प्रत्येक विक्रेता दर दिवशी ८०० ते १००० रुपयांची कमाई करतो. याबाबत ते स्वतः कबुली सुद्धा देतात. त्यामुळे रिकाम्या हाताला काही प्रमाणात का असेना रोजगार प्राप्त झाला आहे. उस व अन्य फळांपासून तयार केलेले नैसर्गिक पेय आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. ही सकारात्मक बाब जाणून शहरातील बहुतांश ग्राहकांचा कल नैसर्गिक पेयाकडे आहे.
बाॅक्स
समारंभाअभावी विक्रीवर परिणाम
काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी व्यापक प्रमाणात सार्वजनिक तसेच खासगी समारंभावर बंदी आहे. साध्या पद्धतीने समारंभाना मंजुरी आहे. त्यामुळे अधिक नागरिक कार्यक्रमांना येत नाही. अशास्थितीत दरवर्षीप्रमाणे व्यवसाय हाेत नाही. व्यावसायिकांना अल्प प्रमाणात नफा मिळताे. आहे त्यातच समाधान मानावे लागते.