पुरूषोत्तम भागडकर।लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुकास्थळापासून १० किमी अंतरावर असलेल्या मोहटोला गावात नवरात्र दरम्यान अखंडटाळ नाद या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे मागील ९० वर्षांपासून ही परंपरा गावकऱ्यांनी जोपासली आहे.मोहटोला येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार अंगिकारणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे तालुक्यात मोहटोला या गावाला गुरूदेवांचे गाव म्हणून ओळखल्या जाते. नवरात्रीच्या पावनपर्वावर शहरापासून खेड्यापर्यंत शारदा, दुर्गांची प्रतिष्ठापना केली जाते. डोळे दीपवून टाकणारी लाईटिंग व विविध देखावे यामुळे शारदा व दुर्गा उत्सवादरम्यान गाव खेड्यात गर्दी जमते. परंतु मोहटोला या गावात मात्र कोणत्याही देवीची प्रतिष्ठापना न करताना नवरात्रीदरम्यान ब्रह्मनाद टाळी सात दिवस सुरू राहते.गावातील हनुमान मंदिरात घटस्थापनेच्या दिवशी घटपूजा करून अखंडटाळीला सुरुवात होते. ती अखंडटाळी रात्रंदिवस सतत सुरू राहणार, यासाठी गावकºयांचे काही गट पाळण्यात आले आहेत. त्यांचे वेळापत्रक तयार करून संबंधित गटाला देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक गटाला स्वयंस्पूर्तीने अखंडटाळीसाठी तीन तासांचा वेळ ठरवून दिलेला आहे. तो गट आपल्या वेळेला उपस्थित राहून सेवा देत आहे. अखंडनाद टाळीसाठी गावकºयांसोबतच जवळपासच्या परिसरातील डोंगरगाव (हलबी), चिखली, रिठ, नैनपूर, देसाईगंज, पिंपळगाव (हलबी), पोटगाव येथील भजन मंडळी सुद्धा उपस्थित राहून अखंडटाळ देत आहेत. बाहेर गावावरून आलेल्या भजन मंडळीचे गावकरी व मंदिर समितीतर्फे आदरातीथ्य करण्यात येते. दररोज सायंकाळच्या सुमारास गावातील आबालवृद्ध मंदिरात एकत्र येतात. त्यामुळे एकात्मतेचे दर्शन घडते. बुधवारी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सात दिवस अखंडटाळ, भजन राहत असल्याने गावात धार्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत होत आहे.याबाबत इतर गावांमध्ये शंकरपटाचे आयोजन केले जायचे. त्यानिमित्त पाहुणे मंडळी एकत्र येऊन वधू-वर पाहणी केली जात होती. अखंडटाळ हा आमच्या गावातील वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव आहे. यानिमित्त बाहेरगावची पाहुणे मंडळी, मुली, जावई व गावातील नोकरीवर असणारे युवक यानिमित्ताने गावात येतात. यानिमित्ताने वर्षाची किमान एकदातरी भेटीगाठी होतात. त्यामुळे स्नेहाचे संबंध कायम राहण्यास मदत होते. या उत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. ही परंपरा आमची नवीन पिढी पुढेही चालू ठेवले.-कैलास पारधी,सरपंच, मोहटोला
मोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 1:31 AM
तालुकास्थळापासून १० किमी अंतरावर असलेल्या मोहटोला गावात नवरात्र दरम्यान अखंडटाळ नाद या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे मागील ९० वर्षांपासून ही परंपरा गावकऱ्यांनी जोपासली आहे.
ठळक मुद्दे९० वर्षांची परंपरा कायम : टाळीसाठी गावातील नागरिकांचे पाळले गट