केंद्रीय रस्ते, मार्ग परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही मंजुरी दिली आहे. त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा करून जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनीही विशेष प्रयत्न केले आहेत. तीन पुलांमध्ये चौडमपल्ली, दीना नदी आणि गुंडेनूर नाल्यावरील पूल असे ते तीन पूल बवणार आहेत. या बांधकामांना मंजुरी दिल्याने जिल्ह्यातील काली दुर्गम भागाच्या दृष्टीने आवश्यक पूल बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तीन पुलांमुळे तेथील लोकांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होणार आहे.
पावसाळ्यात या भागात वारंवार पूल नदीच्या पुरामुळे पाण्याखाली जात होते. त्यांचा प्रशासनाशीही संपर्क राहात नव्हता. त्यामुळे तेथे पुलाची आवश्यकता ओळखून जिल्हाधिकारी सिंगला यांनी व पालकमंत्री शिंदे यांनी पाठपुरावा केला. अखेर त्यात यश आले. या कामाबाबत सविस्तर अंदाजपत्रक ३१ ऑगस्टपर्यंत तयार करण्याचे निर्देश केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत. ही कामे डिसेंबर अखेर निविदास्तरावर येतील, यादृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.
(बॉक्स)
असे असतील नवीन पूल व रस्ते दुरुस्ती
नवीन मंजूर झालेल्या कामांमध्ये आलापल्ली-भामरागड मार्गावरील गुंडेनूर नाल्यावर ८०० मीटर लांबीचा पूल तयार होणार आहे. राष्ट्रीय महामार्गांमध्ये साकोली-वडसा, आरमोरी - आष्टी -आलापल्ली- सिरोंचा रोडवरील दुरुस्ती या कामांसह, दिना नदीवरील १४० मीटर लांबीचा आणि चौडमपल्ली नाल्यावरील ४५ मीटर लांबीचा पूलही मंजूर करण्यात आला आहे.