गडचिरोली : अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी पोलीस विभागाने पुढाकार घेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्रे सुरू केली आहेत. त्यात सुमारे ६२३ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन त्यांचा शिक्षण घेण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे.दुर्गम व नक्षलग्रस्त भागात जिल्हा परिषद शाळा व आश्रमशाळांमुळे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध झाली असली तरी उच्च शिक्षणाची सोय मात्र उपलब्ध नाही. विशेषकरून एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, धानोरा या तालुक्यांमध्ये केवळ तालुकास्थळीच पदवी शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. तालुक्यातील शेवटचे गाव सुमारे ७० ते ८० किमी अंतरावर असतात. वाहतुकीची साधने अत्यंत मर्यादित आहेत. ही अडचण लक्षात घेऊन पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केंद्र स्थापन व्हावे यासाठी पाठपुरावा केला. दामरंचा, गॅरापत्ती, पेंढरी, हेडरी व ताडगाव येथे मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले आहे.२६२३ विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेशउपक्रमाला चांगला प्रतिसाद देत सुमारे ६२३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. नवीन शैक्षणिक उपक्रमामुळे जिल्ह्यात पदवी प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गडचिरोली पोलीस विभागाने सामाजिक कार्याचा नवा अध्याय सुरू केला आहे.
गडचिरोलीतील विद्यार्थ्यांसाठी उघडले मुक्त शिक्षणाचे अनोखे दार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 2:07 AM