लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भूगर्भातील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असलेल्या आठ गावांतील पाण्याच्या स्त्रोतातील पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी शासनाकडून फ्लोराईड रिमूव्हल युनिट लावले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना फ्लोराईडमुक्त पाणी मिळणार आहे. पहिल्यांदाच हा प्रयोग जिल्ह्यात केला जाणार आहे हे विशेष.भूगर्भातील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असेल तर ते पाणी पिण्यासाठी योग्य नसते. त्यातून हातापायांची हाडे वाकडी होऊन विविध आजार उद्भवतात. पण पिण्याच्या पाण्याचे दुसरे स्त्रोत नसल्यामुळे नाईलाजाने लोक ते पाणी पितात. मात्र आता त्यांना फ्लोराईडयुक्त पाण्यापासून मुक्ती मिळून शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे.भूवैज्ञानिकांनी दिलेल्या अहवालानुसार आरमोरी तालुक्यात पाटणवाडा, चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्ली, अहेरी तालुक्यातील कर्नेली, आंबेझरा, भामरागड तालुक्यातील झारेवाडा, धोडराज तसेच सिरोंचा तालुक्यातील गरकापेढा ग्रामपंचायत अंतर्गत येणारे पोचमपल्ली व टेकडामोकला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुत्तापूर माल या आठ गावांमध्ये भूगर्भातील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण १.५ पीपीएम पेक्षा जास्त आढळले. याशिवाय इतर पाच गावांमधील पाण्याच्या स्त्रोतात फ्लोराईड आहे, मात्र त्याची मात्र कमी असल्याने तिथे शुद्धीकरण यंत्र लागणार नाही.विशेष म्हणजे हे यंत्र राज्य शासनच खरेदी करून देणार आहे. मात्र त्याची देखभाल ग्रामपंचायतीला करावी लागणार आहे. त्याची ग्रामपंचायतीची तयारी आहे का? संबंधित गावांमध्ये वीज पुरवठा उपलब्ध आहे का? यंत्र लावण्यासाठी किमान २०० चौरस फूट जागा उपलब्ध आहे का? आदी बाबींची तपासणी करून ग्रामपंचायतींमार्फत तसे प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने मागविले आहेत. सिरोंचा तालुक्यातील दोन गावे वगळता इतर गावांनी प्रस्ताव सादर केले आहेत. हे शुद्ध पाणी गावकऱ्यांना पूर्णपणे फुकटात मिळणार नाही. त्यासाठी प्रतिलिटर काही पैसे मोजावे लागणार आहेत.जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाई नाही !यावर्षी जिल्ह्यात कुठेही पाणी टंचाई जाणवणार नाही, असा अहवाल वरिष्ठ भूजल तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून पाणी टंचाईसंदर्भात कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. काही ठिकाणी हातपंप बंद आहेत. त्यांची दुरूस्ती सुरू असल्याचे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात पाणी टंचाई नाही. मात्र पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचा वापर प्रत्येकाने जपून करावा. गावातील हातपंपांची देखभाल दुरूस्ती होऊन नियमितपणे तो चालू राहावा यासाठी संपूर्ण गावामिळून वार्षिक दोन हजार रुपये एवढे नाममात्र शुल्क भरण्याचीही गावकऱ्यांची तयारी नसते. त्यामुळे अडचणी जातात.- के.आर.घोडमारे, कार्यकारी अभियंता,ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प. गडचिरोली
फ्लोराईडमुक्त पाण्यासाठी आठ गावांत लागणार युनिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 11:43 PM
भूगर्भातील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असलेल्या आठ गावांतील पाण्याच्या स्त्रोतातील पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी शासनाकडून फ्लोराईड रिमूव्हल युनिट लावले जाणार आहेत.
ठळक मुद्देशासन पुरविणार यंत्र : पाण्यासाठी आकारणार शुल्क, ग्रामपंचायतींना करावी लागणार देखभाल