लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, यासाठी स्थानिक गाेंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी १६ नाेव्हेंबरपासून काळ्याफिती लावून आंदाेलन करीत आहेत. तिसऱ्या दिवशीही आंदाेलन सुरुच हाेते.
विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयाेगातील ५८ महिन्यांच्या फरकाची रक्कम शासनाने द्यावी. विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या ७९६ पदांना अद्याप सातवा वेतन आयाेग लागू केला नाही, ताे लागू करावा. नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एकस्तर पदाेन्नती लागू करावी. १०-२०-३० वर्षांच्या सेवेनंतर तीन लाभांची सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती याेजना लागू करावी.
सातव्या वेतन आयाेगाच्या अधिसूचनेत बदल केलेल्या काही पदांच्या वेतनश्रेण्या पूर्ववत कराव्यात. २००५ नंतर नियुक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन याेजना लागू करावी आदी मागण्यांसाठी मागील अनेक वर्षांपासून विद्यापीठाचे कर्मचारी लढा देत आहेत. यासाठी अनेकवेळा शासनाला निवेदने देण्यात आली. माेर्चे काढण्यात आली; मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाचे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १६ नाेव्हेंबरपासून विद्यापीठातील कर्मचारी काळ्याफिती लावून काम करीत आहेत.
आंदाेलनाचे नेतृत्व गाेंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनाेज जाधव, उपाध्यक्ष नीलेश काळे, सचिव सतीश पडाेळे, मार्गदर्शक महादेव वासेकर, सहसचिव श्याम कळस्कर, प्रवीण बुराडे, सुचिता माेरे, मनीषा महात्मे, प्रवीण पहानपटे, डाॅ. सुभाष देशमुख, विपीन राऊत, अविनाश सिडाम, अविनाश आसुटकर यांनी केले आहे.
२२ ला संपाचा इशारा
मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यापीठातील कर्मचारी १६ नाेव्हेंबरपासून काळ्याफिती लावून आंदाेलन करीत आहेत. साेबतच दैनंदिन काम करीत आहेत. शासनाने या मागण्यांबाबत ताेडगा न काढल्यास २२ नाेव्हेंबर राेजी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला जाणार आहे. तसेच हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेवर माेर्चा काढला जाईल. दखल न घेतल्यास बेमुदत कामबंद आंदाेलन करण्याचा इशारा संघटनेचे सचिव सतीश पडाेळे यांनी दिला आहे.