जि. प. सिंचन विभागाचे दुर्लक्ष : अनेक बंधाऱ्यांवर पाणी अडविण्याची व्यवस्था नाही गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या सिंचर्न विभागाच्या वतीने ओढे व छोट्या नाल्यांवर साठवण बंधाऱ्यांची निर्मिती केली जात आहे. अनेक बंधारे समतल रपटेयुक्त बनविले जात आहेत. काही बंधाऱ्यांवर पाणी सोडण्यासाठी दरवाज्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु या बंधाऱ्यांवर दरवाजे अद्यापही न लावल्याने व येथे इतर अन्य सुविधा न पुरविल्याने साठवण बंधाऱ्यामध्ये पाणी साठून राहण्यास अडचणी येत आहेत. संपूर्ण पाणी जमिनीत जिरण्याऐवजी वाहून गेल्याने साठवण बंधारे निरूपयोगी ठरत आहेत. ओढे, नाल्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहावे, अधिकचे पाणी सहज वाहून जावे या हेतूने जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागामार्फत तालुक्यात अनेक ठिकाणी नाल्यांवर जवळपास दोन किमी अंतरावर साठवण बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. व दरवर्षी हे काम नित्यनेमाने सुरू आहे. जवळपास १४ लाख ६३ हजार ७१० रूपयांचा निधी एका साठवण बंधाऱ्याच्या निर्मितीवर खर्च केला जात आहे. परंतु ज्या बंधाऱ्याच्या ठिकाणी पाणी सोडण्यासाठी दरवाज्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा ठिकाणी अद्यापही लोखंडी दरवाजे पोहोचलेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी एकही पाणी साचून राहिले नाही. यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण पाणी वाहून गेले. त्यामुळे साठवण बंधारा निर्मितीच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. तालुक्यातील अमिर्झा परिसरातील अनेक नाल्यांवर साठवण बंधाऱ्या निर्मिती करण्यात आली. येथे या बंधाऱ्यांवर गेट देण्याची मागणी शेतकऱ्यांनी वारंवार जि. प. च्या सिंचाई विभागाकडे विशेषत: सिंचाई उपविभाग गडचिरोली यांच्याकडे केली मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही तीव्र रोष व्यक्त होत आहे. साठवण बंधाऱ्या उद्देश अधिकाधिक पाणी जमिनीत मुरवणे व शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा उपयोग होणे असा असला तरी याला हरताळ फासला जात आहे.
सोयीअभावी साठवण बंधारे निरूपयोगी
By admin | Published: February 16, 2017 1:55 AM