जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील कोरेगाव येथील कृषी पंप शेतकऱ्यांना मीटर रीडिंगनुसार बिल न देता अतिरिक्त म्हणजे अवाच्या सवा सरासरी बिल देऊन विद्युत महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
आरमोरी तालुक्यातील कोरेगाव येथे सन २०१७ - १८ मध्ये तालुका कृषी विभागअंतर्गत जल शिवार योजनेतून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खोदतळ्याची कामे, तसेच सिंचन विहिरीची कामे देखील हाती घेऊन शासनाने पूर्णत्वास नेली. मात्र या सिंचन क्षेत्राखाली आलेल्या शेतकऱ्यांनी शेतात कृषी पंप मिळण्याकरिता डिमांड भरूनही आजतागायत दोन-तीन वर्षापासून शेतातील विद्युत जोडणी करून दिली नाही. त्यामुळे हे शेतकरी जवळच्या विद्युत खांबावर आपल्या मोटर पंपच्या विद्युत तारा टाकून शेतातील उत्पन्न घेत आहेत. मात्र या सर्वांचा भुर्दंड अधिकृतरित्या ज्यांच्याकडे विद्युत मोटार पंप आहे, त्यांना बसत आहे.
विद्युत महावितरण कंपनी थेट शेतकऱ्यांच्या विद्युत मीटरनुसार रीडिंग घेऊन बिल न देता, डीपीवरील सरासरीनुसार अधिकृत मोटर पंप धारकांवर बिलाचा बाेजा टाकत आहे. खरीप पिकावरील अडीचशे प्रादुर्भाव दरवर्षीचे नैसर्गिक संकट यातूनच शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असून पुन्हा विद्युत वापरापेक्षा अतिरिक्त विद्युत बिलामुळे हा शेतकरी वर्ग संतापला आहे.
(बॉक्स)
डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना भुर्दंड नको
मीटर रीडिंगनुसार बिल देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून ज्या शेतकऱ्यांनी डिमांड भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांना वीजचोरीपासून वाचवावे. त्याचा भुर्दंड इतर शेतकऱ्यांना होणार नाही, याकरिता या शेतकऱ्यांना त्वरित शेतावरील विद्युत पंपाची जोडणी करून देण्याची मागणी कोरेगाव येथील सरपंच बालाजी गेडाम, रामा घोडाम, धर्मा जांभुळकर, झेलू जांभुळकर, हरिभाऊ शेंडे, मनिराम टेंभुर्णे, विजयराव मरावी, श्रीहरी पुराम, विठ्ठल टेंभुर्णी, साधू आलाम, शांताबाई गेडाम आदी शेतकऱ्यांनी केली आहे.