गडचिराेली : ऐन धान कापणीच्या हंगामात अवकाळी पावसाने जिल्हाभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे धानाच्या बांध्यांमध्ये पाणी साचून धान पिकाचे माेठे नुकसान हाेत आहे. हातात आलेले पीक नष्ट हाेताना बघून शेतकरी चिंतेत पडला आहे.
गडचिराेली जिल्ह्यात धान हे मुख्य पीक आहे. नाेव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून धान कापणीला सुरुवात झाली हाेती. आतापर्यंत धान कापणीचे काम आटाेपून मळणीला सुरुवात झाली असती. मात्र पावसामुळे काही शेतकऱ्यांनी धान कापणी थांबविली आहे. ज्या शेतकऱ्यांनी धान कापले त्यांच्या बांध्यांमध्ये पाणी साचून धान पीक कुजत आहे. काही शेतकऱ्यांचे धान अंकुरले आहे.
विशेष म्हणजे सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे बांधणीची कामेसुद्धा थांबली आहेत. पावसामुळे तांदूळ काळा पडून अतिशय कमी भाव येणार आहे. कुजलेली तणीस जनावरे खात नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही शेतकऱ्यांसमाेर निर्माण झाला आहे.
पेरणी, रोवणी, खते, कीटकनाशके यावर लाखो रुपये खर्च झाले आहेत. कापणीचाही खर्च खेतकऱ्यांवर बसला आहे. ऐन धान घरी येण्याच्या वेळेवर असे नुकसान झाल्याने काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
पंचनामे करताना दमछाक
पिकाचे नुकसान झाल्यास त्याचे पंचनामे करण्याची जबाबदारी कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवकाची राहते. जवळपास २५ टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामे करताना कर्मचाऱ्यांची दमछाक हाेत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे शिल्लक आहेत. काही शेतकऱ्यांची बांधणी झाल्यानंतर पंचनामे हाेत आहेत. पंचनाम्यांचे काम आटाेपून लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.
बाेंडातील कापुसही पडले काळे
चामाेर्शी, मुलचेरा, सिराेंचा, अहेरी या तालुक्यांमध्ये माेठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. मागील आठ दिवसांपासून अधून-मधून पडत असलेल्या पावसामुळे बाेंडातील कापूस काळा पडला आहे. काही कापूस जमिनीवर पडल्याने ते मातीमाेल झाले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांबराेबरच कापुस उत्पादक शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे.