एटापल्ली : कमी दिवसांत अधिकाधिक कमाई करून देणारा हंगाम म्हणून ग्रामीण भागात तेंदूपत्ता हंगामाकडे बघितले जाते. यावर्षी अहेरी उपविभागासह जिल्हाभरात तेंदूपत्ता संकलनाच्या कामास सुरूवात झाली. मात्र गेल्या आठ-दहा दिवसांपासून अधूनमधून अवकाळी वादळी पाऊस बरसत असल्यामुळे तेंदू हंगाम प्रभावित हाेत आहे.
तेंदूपाने ताेडून आणल्यावर त्याचे पुडे फळीवर नेताच पाऊस हाेत असल्याने मजुरांना फळीवर नेलेले पुडे पुन्हा घरी आणून ठेवावे लागत आहे. एकूणच यावर्षीच्या तेंदू व्यवसायाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
एटापल्ली तालुक्यात दर वर्षीप्रमाणे याहीवर्षी १५ मे नंतर सर्व तेंदूपत्ता फळी सुरु झाले आहे. परंतु यावर्षी अवकाळी पाऊस दररोज हजेरी लावत आहे. तेंदूपत्ता पाच ते आठ दिवस तोडला जाताे. पत्ता तोडाईच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून दररोज अवकाळी पाऊस हाेत असल्याने अनेक फळीवर तेंदूपुडे खरेदी करणे बंद केले आहे. दुसऱ्या दिवशी आणा असे मजुरांना सांगण्यात येत आहे. तसेच पाऊस आलेल्या दिवशी तेंदूपत्ता ताेडू नका, असे मजुरांना सांगितले जात आहे. त्यामुळे दरवर्षी सात दिवसांपर्यंत तोडाई असणारा तेंदूपत्ता अवकाळी पावसामुळे लांबणीवर जाणार का, संकलनाचे काम बंद होणार, अशी भीती मजूर वर्गामध्ये दिसून येत आहे.
तेंदूपत्ता संकलन व बाेधभराईचा कालावधी पूर्णत: एक महिन्याचा असताे. एटापल्ली तालुक्यात १५ मे ते १५ जून हा कालावधी साधारण दरवर्षीप्रमाणे ठरला आहे. पाऊस दररोज सुरु राहिल्यास तेंदूफळी बंद केली जाण्याची भीती मजुरांमध्ये व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास मजूर वर्गांचा राेजगार हिरावणार आहे.
बाॅक्स...
तेंदू कंत्राटदारांचे नुकसान हाेणार
तेंदूपत्ता व्यवसायाला पोषक वातावरण म्हणजे कडक ऊन पाहिजे. परंतु यावर्षी अवकाळी पावसाचा फटका कंत्राटदारांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अवकाळी पावसामुळे तेंदूपानाचा दर्जा खालावताे. तसेच खरेदी केलेल्या पानाला कीड, उधळी लागते, पाने भिजून खराब होतात. जाेरदार पाऊस झाला तर नाल्यातील तेंदूपत्ता वाहून जातो. वादळामुळे हजारो पुडे उडून जातात. यात कंत्राटदाराचे मोठे नुकसान हाेते.