जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : माहिती भरण्याकडे अनेक विभागांचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : वृक्ष लागवड अंतर्गत यंत्रणांनी कोणत्याही परिस्थितीत २५ जूनपर्यंत खड्डे खोदून त्यांची माहिती अपलोड करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना दिले. राज्यात १ ते ७ जुलै दरम्यान ४ कोटी वृक्ष लागवड करण्याचे निश्चित झालेले आहे. गडचिरोली जिल्ह्याकरिता विभागनिहाय रोपवनाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. सदर रोपवनाचे क्षेत्रनिहाय उद्दिष्ट संख्या, त्याकरिता खोदण्यात आलेले खड्डे संख्या, लावण्यात येणाऱ्या रोपांच्या प्रजातीची माहिती व रोपवन क्षेत्राचे छायाचित्र आदी माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्याकरिता वेळोवेळी सुचना देण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण सुध्दा देण्यात आले आहे. परंतु अजूनपर्यंत समाधानकारक माहिती अपलोड करण्यात आली नाही. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभाग प्रमुखांनी कोणत्याही परिस्थितीत २५ जूनपर्यंत वृक्ष लागवडीच्या तयारीबाबतची माहिती अपलोड करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक प्रमाणात वृक्ष लागवड झाली पाहिजे, यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. यावेळी सहायक जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावळेकर, उपवनसंरक्षक शिवाजी फुले व सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
वृक्ष लागवड तयारीची माहिती अपलोड करा
By admin | Published: June 21, 2017 1:36 AM