लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : माझे कर्म स्ट्राँग आहे. त्यामुळे माझ्या विरोधात जाल तर तुमचे चांगले होणार नाही, असा इशारा देताना माझ्यासोबत प्रामाणिकपणे काम करा. माझा वापर करा, पण मला ‘टार्गेट’ करू नका. मला प्रामाणिकपणे साथ द्याल तर मी जिल्ह्यात काँग्रेसचे तीनही आमदार आणि खासदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मदत व पुनर्वसन तथा ओबीसी विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच गडचिरोलीत आगमन झाल्याबद्दल ना.वडेट्टीवार यांचा महाविकास आघाडी आणि मित्र परिवाराच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, प्रदेश यु.काँ.चे चिटणीस अतुल मल्लेलवार, प्रदेश महिला काँग्रेसच्या डॉ.चंदा कोडवते, जि.प.सदस्य अॅड.राम मेश्राम, माजी जि.प.अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, प्रा.राजू कात्रटवार, दीपक मडके, डॉ.नितीन कोडवते, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे यांच्यासह अनेक पदाधिकारी विराजमान होते.यावेळी अनेक कर्मचारी व सामाजिक संघटना, पक्षीय कार्यकर्ते यांच्यावतीने ना.वडेट्टीवार यांचा शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील नागरिकांनी सत्कारासाठी एकच झुंबड केली होती. तब्बल २५ मिनिट सत्काराचा हा सोहळा रंगला.या सत्काराला उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, राजकारणात कोणतेही पद कायमस्वरूपी नसते. जोपर्यत सत्तेचा उपयोग लोकांसाठी करतो तोपर्यंत लोक सोबत असतात. पण नेता जर त्या पदाचा उपयोग स्वार्थासाठी करू लागला तर लोक सत्तेतून बाहेर करतात. मी महत्वाकांक्षी आहेच, पण ही महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुमचे सहकारीही प्रामाणिक असावे लागतात, असे ते म्हणाले. गडचिरोलीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी कायम या जिल्ह्याची सेवा करणार, चांगले वातावरण निर्माण करणार, असे ना.वडेट्टीवार म्हणाले. आपल्या खात्यातून ओबीसी मुला-मुलींसाठी वसतिगृह, १२ बलुतेदारांसाठी कीट, बार्टी-सारथीच्या धर्तीवर ओबीसींना रोजगार निर्मितीसाठी ‘महाज्योती’च्या माध्यमातून कर्जपुरवठा होईल, अशी माहिती त्यांनी दिली.तत्पूर्वी अॅड.राम मेश्राम यांनी ना.वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षाला अडचणीच्या वेळी कसे तारले हे सांगून आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्यालाच डावलण्याचा प्रयत्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाल्याची खंत व्यक्त केली. डॉ.उसेंडी यांनी वडेट्टीवार यांना मिळालेल्या ओबीसी खात्यातून ते या ७५ टक्के असलेल्या समाजाला न्याय देतील, असा विश्वास व्यक्त केला. बंडोपंत मल्लेलवार, प्रा.राजू कात्रटवार यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक डॉ.हेमंत अप्पलवार यांनी केले. संचालन प्रा.रेवनदास शेडमाके यांनी तर आभार रमेश चौधरी यांनी मानले.खुल्या वाहनातून मिरवणूकना.वडेट्टीवार यांचे आरमोरीमार्गे आगमन होताच बस थांब्याजवळ त्यांचे युवक काँग्रेसच्या वतीने आतिषबाजीने स्वागत करण्यात आले. यावेळी खुल्या वाहनावरून त्यांची शहराच्या जुन्या वस्तीमधील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रस्थानी ढोलताशासह आदिवासी नृत्य सादर केले जात होते. महात्मा गांधी चौक, त्रिमूर्ती चौक, इंदिरा गांधी चौकमार्गे ही मिरवणूक कात्रटवार कॉम्प्लेक्समधील कार्यक्रमस्थळी पोहोचली. मार्गात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. ज्या भागात आपण सामान्य नागरिक म्हणून लहानाचे मोठे झालो त्या भागातील नागरिकांचे प्रेम पाहून ना.वडेट्टीवार भारावून गेले होते.
माझा वापर करा, पण मला टार्गेट करू नका -वडेट्टीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 6:00 AM
अॅड.राम मेश्राम यांनी ना.वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षाला अडचणीच्या वेळी कसे तारले हे सांगून आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्यालाच डावलण्याचा प्रयत्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाल्याची खंत व्यक्त केली. डॉ.उसेंडी यांनी वडेट्टीवार यांना मिळालेल्या ओबीसी खात्यातून ते या ७५ टक्के असलेल्या समाजाला न्याय देतील, असा विश्वास व्यक्त केला. बंडोपंत मल्लेलवार, प्रा.राजू कात्रटवार यांनीही मनोगत व्यक्त केले.
ठळक मुद्देपक्षांतर्गत विरोधकांना इशारा । गडचिरोलीत भव्य स्वागत व नागरी सत्कार