सतर्कता : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज; ग्रामीण व दुर्गम भागात जनजागृतीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्ती टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने पारंपरिक साधनांबरोबरच सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर केला जात आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या सूचना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. गडचिरोली जिल्ह्याचा ८० टक्के भूभाग जंगलाने व्यापला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सुध्दा अधिक आहे. जिल्ह्यातून वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पर्लकोटा, इंद्रावती, पामुलगौतम, खोब्रागडी, कठाणी, दिना यासारख्या प्रमुख नद्या वाहतात. यातील बहुतांश नद्या जंगलातून वाहतात. त्यामुळे पाऊस झाल्याबरोबर नद्यांची पातळी अचानक वाढते. परिणामी अनेक गावांना पुराचा फटका बसतो. जंगलव्याप्त व नक्षलग्रस्त भाग असल्याने या परिसरात पोलीस तसेच इतर प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळीच मदत करताना मर्यादा येतात. भामरागड, एटापल्ली या दोन तालुक्यातील बहुतांश गावे पावसाळयादरम्यान संपर्कक्षेत्राच्या बाहेर राहतात. जंगली भाग असल्याने विजा पडण्याच्याही घटना अधिक आहेत. साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने आपत्तीबाबत नागरिक फारसे जागरूक राहत नाही. एकंदरीतच पावसाळ्यादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची बनते. या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला तारेवरची कसरत करावी लागते. आपत्तीचा सामना कशा प्रकारे करावा, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने गावांमध्ये पॉम्प्लेट लावून, तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून संदेश पाठवून जनजागृती केली जात होती. मात्र ही सर्व साधने वापरताना मर्यादा आहेत. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने व्हॉटस्अॅप, फेसबूक यासारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा खुबीने वापर करण्यास सुरूवात केली आहे. मागील चार वर्षांपासून जवळपास प्रत्येक युवकाच्या हातात स्मार्ट फोन आला असल्याने व्हॉटस्अॅप, फेसबूक यासारख्या सोशल मीडियाचा वापर अगदी सामान्य झाला आहे. सोशल मीडियाच्या वापराचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याने या साधनांचा वापर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. हे सर्व काम जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी क्रिष्णा रेड्डी करीत आहेत. मराठी व गोंडी भाषेत आॅडिओ जिंगल्सजिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने गोंडी व मराठी या दोन भाषांमध्ये आॅडीओ जिंगल्स तयार केल्या आहेत. या जिंगल्स गडचिरोली येथील बसस्थानकावर वाजविल्या जात आहेत. या जिंगल्समध्ये मलेरिया, डेंग्यू आजारापासून बचावासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या, विजेपासून धोका होऊ नये यासाठी काय करावे आदी सल्ल्यांचा समावेश आहे. बसस्थानकावर दरदिवशी ग्रामीण भागातून हजारो नागरिक येतात. बसची प्रतीक्षा करीत बसले असताना आॅडीओ जिंगल्सही कानावर पडतात. त्यामुळे त्यांना बसल्या बसल्या सल्ला मिळण्यास मदत होते. या जिंगल्स व्हॉटस्अॅप व फेसबूकवरही पाठविल्या जात आहेत. वर्षभरात आठ लाख संदेश पाठविलेजिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे काम वर्षभर सुरू राहते. या विभागाने वर्षभरात सुमारे १२ लाख मॅसेज पाठविले आहेत. या मॅसेजमध्ये वातावरणाची सूचना दिली जाते. कोणत्या दिवशी अतिवृष्टी होणार आहे, याबाबतची पूर्वकल्पना नागरिकांना दिली जाते. त्यामुळे नागरिकांना जागृक होण्यास मदत होत आहे. फेसबूकवर डीएमसेल नावाचे स्वतंत्र फेसबूक पेज तयार करण्यात आला आहे. या फेसबूक पेजवर दर दिवशीचे पर्जन्यमान व आपत्तीतून घ्यावयाची काळजी याबाबतच्या सूचना टाकल्या जात आहेत. आपत्ती व्यवस्थापनमार्फत प्रसार माध्यमांनाही दररोज पर्जन्यमान, वातावरणाच्या स्थिती बाबतची माहिती दिली जात आहे.
सोशल मीडियाचा खुबीने वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2017 1:38 AM