पोकलँड मशीनने सिंचन विहिरीचे काम : आधुनिक तंत्रज्ञानाने बांधकाम झाले सुलभ मानापूर/देलनवाडी : विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व क्षेत्रात आता होऊ लागला आहे. याला कृषी क्षेत्रही अपवाद ठरले नाही. दिवसेंदिवस मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने कमी वेळेत चांगले काम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानातून यंत्राचा वापर कृषी क्षेत्रातही वाढला आहे. आरमोरी तालुक्याच्या मानापूर, देलनवाडी परिसरात मजूर मिळत नसल्याने पोकलँड मशीनच्या सहाय्याने सिंचन विहिरीचे खोदकाम हाती घेण्यात आले. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सध्याच्या युगात नागरिकांचे जीवन अधिक सुखकर होण्यास मोलाची मदत झाली असून तसे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. विविध यांत्रिकी उपकरणाद्वारे शेतीची मशागत करणे, पीक लागवड करून उत्पादन घेणे आदी कामे सुलभ झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व ११ हजार सिंचन विहीर कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरीचे काम मंजूर करण्यात आले आहेत. आरमोरी तालुक्यातही अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीत सिंचन विहिरीचे काम गेल्या काही दिवसांपासून हाती घेतले आहे. याशिवाय शासनाने मागेल त्याला सिंचन विहीर ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सदर योजनेची अंमलबजावणी धडाक्यात सुरू आहे. पूर्वीच्या काळाप्रमाणे आता अंगमेहनतीचे काम करण्यास मजूर मिळत नाही. त्यामुळे सिंचन विहिरीच्या कामात पोकलँड, जेसीबी व इतर यंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे कमी कालावधीत सिंचन विहिरीचे काम पूर्ण करणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. यंत्रामुळे योजनेच्या कामात गती आली आहे. याशिवाय अनेक शासकीय बांधकामातही यंत्राचा वापर सर्रास केला जात आहे. (वार्ताहर) मजुरांची समूह संख्या घटली सात ते आठ वर्षापूर्वी विविध शासकीय योजनेतून सिंचन विहिरीचे काम मंजूर केले जात होते. तसेच शेतकरी स्वत: पुढाकार घेऊनही सिंचन सुविधेसाठी विहिरीचे बांधकाम करीत होते. पूर्वी बहुतांश गावात विहीर खोदकाम व बांधकाम करणाऱ्या मजुरांचे समुह मोठ्या संख्येने होते. मात्र आता मजुरांचे समुह राहिले नाही. त्यामुळे यंत्राचा वापर वाढला आहे.
विहिरीच्या खोदकामात यंत्राचा वापर
By admin | Published: April 20, 2017 2:05 AM