गडचिरोली : गडचिरोली शहरासह अनेक तालुका मुख्यालयाच्या उपाहारगृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र याकडे संबंधित विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. उपाहारगृह, हॉटेल तसेच टपऱ्यांवरील स्वच्छता, पिण्याचे पाणी व इतर वस्तूंची तपासणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. उपहारगृह तसेच हॉटेलमधून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र अशा प्रकारची तपासणी जिल्ह्यात कुठेही होतांना दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, अहेरी, एटापल्ली, आलापल्ली आदी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी अनेक उपाहारगृह, हॉटेल व हातटपऱ्या आहेत. तसेच जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्येही हातठेले आहे. या सर्वच ठिकाणी खाद्यपदार्थाची उघड्यावरच विक्री केली जात असल्याची दिसून येते. उघड्यावर ठेवलेल्या खाद्यपदार्थावर माशा घोंगावत असल्याचे बरेचदा आढळून येते. स्वच्छता राखण्यात न आल्याने अशी परिस्थिती उद्भवते. नियमांचे उलंघन होत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. मात्र याबाबतीत कोणतीही कारवाई होत नसल्याने संबंधित हॉटेल, उपहारगृह मालक व हातठेलेधारकांची हिम्मत वाढत आहे. गडचिरोलीसह अन्य तालुका मुख्यालयी भरत असलेल्या बाजारातही उघड्यावच खाद्यपदार्थाची विक्री केली जात आहे. आठवडी बाजारात खाद्यपदार्थांची अनेक दुकाने अस्वच्छ जागेवर लावत असल्याचे दिसून येत आहे. बरेचशे दुकाने नालीच्या बाजूलाच थाटलेली असतात. या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जात नसल्याने उघड्यावरील पदार्थांवर रोग जंतू बसल्याने विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. सध्या सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मात्र असे असतांनाही उपहार गृह, हॉटेल तसेच हातठेलाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवित येत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी अस्वच्छता कायम आहे. उघड्यावरील खाद्य पदार्थांच्या संदर्भात प्रशासनाने एक विशेष समिती गठित करून दरमहा हॉटेल, उपहार गृह व हातठेल्याच्या ठिकाणची तपासणी करावी, तसेच अस्वच्छता व पिण्याच्या पाण्याची चांगली सुविधा नसलेल्या हॉटेल, उपाहारगृह मालक व हातठेला धारकांवर कारवाई करावी. जेणेकरून रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.
उपाहारगृहांमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन
By admin | Published: November 17, 2014 10:52 PM