गडचिरोली : येथील गोकुलनगरात नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी नियमितपणे कचरा उचलण्यासाठी येत नाही. त्यामुळे परिणामी वॉर्डामध्ये बहुतांश ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. या ठिकाणचा कचरा उचलला जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत नगर परिषदेकडे अनेकवेळा तक्रार करूनही स्वच्छता राखण्याबाबत दखल घेतली जात नाही.
तहसीलमध्ये पदे रिक्त
गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात लिपीक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने सदर योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे.
भामरागड तालुक्यातील गावांना विजेची प्रतीक्षा
भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील अनेक गावांत विजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर ताराही ओढण्यात आल्या. मात्र यावर वीजपुरवठा सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे या भागातील नागरिक अद्यापही विजेच्या प्रतीक्षेत आहेत.
कार्यालयांमध्ये दस्तावेजांचा पसारा
गडचिरोली : दिवसेंदिवस शासकीय कार्यालयांमधील फाइलची संख्या वाढत चालली आहे. जिल्हा परिषदसह अनेक कार्यालयांमध्ये या फाइल ठेवण्यासाठी जागा नाही. मागे फाइलचा गट्टा व समोर कर्मचारी खुर्ची लावून बसले आहेत. दस्तावेजांच्या जतनासाठी स्वतंत्र खोलीची गरज आहे.
शासकीय विहिरींवर खासगी पंपांचा कब्जा
आरमोरी : तालुक्यातील अनेक शासकीय विहिरींवर खासगी पाणीपंप लावण्यात आले आहेत. मात्र याबाबत ग्रामीण भागातील नागरिक तक्रार करीत नाही. ग्रामपंचायतीने स्वत: दखल घेऊन अशा प्रकारच्या अवैध मोटार काढणे आवश्यक असतानाही दुर्लक्ष होत आहे, असा आरोप होत आहे.
कडेलगत वाहनांची गर्दी
गडचिरोली : चामोर्शी मार्गाने सेमानाकडे प्रचंड वाहतूक वाढली आहे. दरम्यान, या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी व दुचाकी वाहने उभ्या केल्या जातात. यामुळे आवागमन करणाऱ्या वाहनांना रस्ता उरत नाही. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे. पोलीस व परिवहन विभागाने वाहनावर कारवाई करावी.
बाजारात स्वच्छतागृह द्या
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौक शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात कुठेही जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातूनच मार्गक्रमण करावे लागते. अनेक नागरिक चौक परिसरात विसावा घेतात. नागरिकांना मुतारीसाठी नाहक त्रास सहन करावा लागतात. या ठिकाणी स्वच्छतागृह निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शिधापत्रिका मिळेना
कुरखेडा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना शिधापत्रिका मिळाली नसल्याने अजूनही ते वंचित आहेत. तहसील कार्यालयात परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज केल्यानंतरही तालुक्यातील एपीएल नागरिकांना शिधापत्रिका देण्यात आल्या नाही. अर्ज केल्यानंतरही अनेक महिने नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागते.
कोरचीतील रस्ते खड्डेमय
कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर गवत उगविले आहे. गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी आहे. खड्ड्यांमुळे अपघात हाेण्याची शक्यता बळावली आहे.
पाण्याचा अपव्यय सुरूच
गडचिरोली : स्थानिक नगरपालिका क्षेत्रात खूप जुनी नळ पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या सखल भागातील नळ पाणीपुरवठा दिवसभर सुरू असतो. त्यामुळे हजारो लिटर पाणी व्यर्थ जाते. सखल भागात अनेक ठिकाणी व्हॉल्व्ह बसविण्याची गरज आहे. मात्र नगर परिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे.
प्रवासी निवाऱ्याची गरज
गडचिरोली : गडचिरोलीवरून आरमोरी, देसाईगंज तसेच ब्रह्मपुरी, नागपूरकडे प्रवासी वाहनांची मोठी वर्दळ असते. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. मात्र आरमोरी मार्गावर प्रवासी निवारा नसल्याने त्रास होत आहे. प्रशासनाने येथे प्रवासी निवारा निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.