गडचिरोली : खरेदीच्या व्यवहारात हुंड्या काढण्यापासून धान भरडाई, तसेच इतर सर्व कामे महामंडळामार्फत होतात. मात्र, महामंडळाच्या गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालयांतर्गत सर्वच पाच उपप्रादेशिक कार्यालयांत, तसेच प्रादेशिक कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची मिळून २२० पैकी जवळपास दीडशे पदे रिक्त आहेत. कार्यरत अपुऱ्या कर्मचाऱ्यांवरच महामंडळाचा कारभार चालविला जात आहे.
सेवा केंद्रांअभावी नागरिकांची पायपीट
गडचिरोली : अहेरी तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे लोकांना निर्माण करण्यात आलेले महा- ई- सेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० कि.मी.चे अंतर कापावे लागते. यात नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे महा- ई- सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रस्त्यावर आलेली झाडे तोडण्याची मागणी
आरमोरी : लोहारा ते रांगी, पिसेवडधा ते रांगी या मार्गावर अनेक झाडे रस्त्यावर आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येते. वन विभागाने या झाडांची तोड करावी, अशी मागणी आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष आहे.
पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच द्या
गडचिरोली : जिल्ह्यात बऱ्याच जनावरांना विविध आजारांनी ग्रासले आहे. येथील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी गावात फिरून पशुवैद्यकीय सेवा देत आहेत. त्यामुळे या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विमा कवच लागू करावे, अशी मागणी होत आहे.
रस्त्यालगतच्या उभ्या वाहनांकडे दुर्लक्ष
गडचिरोली : गडचिरोली शहरातून जाणाऱ्या चामोर्शी, धानोरा, आरमोरी व चंद्रपूर या चारही मार्गांलगत ट्रक व मोठी चारचाकी वाहने तासन्तास उभी केली जातात. काही वाहने रात्री व दिवसाही उभी असतात. या वाहनांमुळे पायदळ जाणारे नागरिक, तसेच दुचाकीस्वारांना त्रास होत असतो. एकावेळी दोन वाहने आल्यास वाहन वळविताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतूक पोलिसांनी उभ्या असलेल्या वाहनांवर कठोर कारवाईची मागणी आहे.
राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा उघडा
भेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा हे गाव मध्यवर्ती ठिकाण आहे. या गावात जिल्हा सहकारी बँकेची शाखा आहे; परंतु येथे नेहमीच गर्दी असते. त्यामुळे १० ते १२ कि.मी. अंतरावरून आलेल्या ग्राहकांना कामाशिवाय परत जावे लागते. त्यामुळे येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा उघडावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर सुरूच
गडचिरोली : ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना काम मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर कामासाठी छत्तीसगड व तेलंगणा राज्यात स्थलांतर करत आहेत. सदर मजूर तेंदुपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू होईपर्यंत परतणार नाहीत. गोदावरी नदीवर पूल झाल्याने तेलंगणात स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या वाढली आहे.
भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत
सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे; परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. अंकिसा परिसरातील लक्ष्मीदेवीपेठा, बालमुत्त्यमपल्ली, कंबालपेठा, राघवरावनगर, जंगलपल्ली, गेर्रेपल्ली आदी गावे येतात.
अंकिसात स्वच्छतेकडे ग्रा.पं.चे दुर्लक्ष
अंकिसा : शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर यासाठी जनजागृती केली जात आहे; परंतु अंकिसा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला सर्वत्र प्लास्टिक, कचरा, काचेच्या बाटल्या व अन्य कचरा दिसून येतो.
मुलचेराला जोडणारे मार्ग खड्डेमय
मुलचेरा : तालुक्याला जोडणाऱ्या अहेरी, चंद्रपूर, गडचिरोली या तिन्ही मार्गांवर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली असल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मुलचेरा तालुक्यात ६८ गावांचा समावेश आहे. देशबंधू ग्राममार्गे तहसील कार्यालय, महाराष्ट्र बँक, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, कृषी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, सहकारी बँक आहे. या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे.
टिल्लू पंप लावणारे कारवाईपासून दूर
गडचिरोली : शहरातील अनेक वॉर्डांत टिल्लू पंप लावून अवैधरीत्या पाणी ओढले जात आहे. परिणामी, अनेक वॉर्डांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नळांना केवळ पाच ते सहा गुंड पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. नळाला पाणी आल्यानंतर अनेक नागरिक छुप्या पद्धतीने लावलेला टिल्लू पंप सुरू करतात.
डास निमूर्लनासाठी धुरळणी करा
धानोरा : अनेक वर्षांपासून धुरळणी झाली नाही. वाढणाऱ्या डासांच्या पैदासीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धुरळणी करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे. मात्र, नगरपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
वीज कर्मचाऱ्यांना मुख्यालय सक्ती करा
आलापल्ली : ग्रामीण भागात कार्यरत असलेले बहुतांश वीज कर्मचारी मुख्यालयी न राहता गडचिरोली, चामोर्शी येथे राहून ये- जा करतात. रात्रीच्या सुमारास बिघाड निर्माण झाल्यास हा बिघाड दुरुस्त करणे शक्य होत नाही.
वाहनांच्या वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवा
चामोर्शी : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र, अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहन चालवतात. अशा वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अनेक गावे विहिरीच्या पाण्यावर अवलंबून
आलापल्ली : जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. एकूण लोकसंख्येच्या केवळ १९.५० लोकसंख्याच नळाचे पाणी पिण्यासाठी वापरते. उर्वरित जनतेला विहीर, हातपंपाच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. ग्रामपंचायतीमार्फत नियमितपणे विहीर व हातपंपामध्ये ब्लिचिंग पावडर टाकले जात नाही. त्यामुळे सदर पाणी पिण्यायोग्य राहत नसल्याचे आढळून आले आहे.
सावरगाव परिसर दुर्लक्षित
धानोरा : छत्तीसगड व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या सावरगाव परिसरातील गावांचा विकास रखडला आहे. हा परिसर आदिवासीबहुल व नक्षल प्रभावित आहे. याठिकाणी नेमण्यात आलेले कर्मचारी नियमित कर्तव्य बजावत नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांना शासकीय योजनांची माहिती नाही.
लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : गर्भवती व प्रसूत झालेल्या मातांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही.
पोर्ला बसस्थानकावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली- आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा
आरमोरी : शहरात सार्वजनिक मूत्रीघर नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मूत्रीघरे तयार केली आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. नगर परिषदेने शहरातील मुख्य ठिकाणी सार्वजनिक मूत्रीघर बांधण्याची गरज आहे.
मूलभूत समस्या साेडविण्याची मागणी
कमलापूर : अहेरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथे सोयी-सुविधांची भरमार असणे जनतेला अपेक्षित होते; परंतु कित्येक वर्षांपासून गावातील नागरिकांना मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही कमलापूर भागातील समस्या मार्गी लागल्या नाहीत.
पशुधन सांभाळताना पशुपालक त्रस्त
अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र बऱ्याच पशुपालकांकडे हाडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. अनेक शेतकरी असे पशुधन विकण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ते खरेदी करण्यासाठी कुणी पुढे येत नसल्याने पशुपालकांची अडचण झाली आहे. पशुधन पाळण्यापेक्षा शेतकरी कुक्कुटपालनकडे वळत आहेत.
खरपुंडी मार्गावर पथदिवे लावा
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीज तारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाहीत. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी आहे.
अल्पवयीनांवर कारवाई करा
देसाईगंज : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
हेमाडपंती शिव मंदिर जीर्णावस्थेत
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिव मंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंती आहे. अमिर्झापासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते.
पर्जन्यमापक वास्तूची दुरुस्ती करा
सिरोंचा : ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारीत असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. नदीच्या काठावर असलेल्या सिरोंचा शहराला इंग्रज कालावधीपासून महत्त्व आहे.
डास व कीटकांपासून आरोग्य धोक्यात
गडचिरोली : शहरातील बहुतांश वाॅर्डांतील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपन स्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी, डास व कीटकांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डातील नाल्या तसेच डबक्यांमध्ये फवारणी करावी, अशी मागणी आहे.
वनहक्क प्रकरणे रखडली
सिरोंचा : वनहक्क कायद्यानुसार वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून वनहक्क प्रदान केला जातो. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात हजारो नागरिकांना अजूनही वनपट्टे प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे नागरिक कार्यालयांचे उंबरठे झिजवीत आहेत.
राजोलीत अर्धवट पुलावरून प्रवास
धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ कि.मी. अंतर कापून धानोरा तालुका मुख्यालय व गडचिरोली मुख्यालय गाठावे लागते.
कुरखेडा येथे पार्किंगची व्यवस्था करा
कुरखेडा : शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने ठेवतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून, अपघाताची शक्यताही वाढली आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने दुकानात येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो.
पशुखाद्याच्या किमतीत भरमसाठ वाढ
आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्याचा कोंडा चारला जातो. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यालाही बसला आहे. पशुखाद्याच्या किमती जवळपास १० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
कोरची विश्रामगृहाची मागणी प्रलंबितच
कोरची : कोरची तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक विस्तारित क्षेत्राचा विचार करून कोरची येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. नागरिकांकडून तशी अनेकदा मागणी करण्यात आली. सदर विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबितच आहे. कोरची हे जिल्ह्याचे शेवटचे ठिकाण आहे. विश्रामगृह बांधल्यास याठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सोयीचे होणार आहे.