आॅनलाईन लोकमतदेसाईगंज : कोणत्याही क्षणी गावातील आजारी व रोगग्रस्त तसेच शेवटच्या माणसाला औषधीचा लाभ देण्याचे पवित्र कार्य वैदू करतात. त्यामुळे समाजाने त्यांच्याप्रती आदर दाखवावा. वैदूंना केवळ वैदू न म्हणता, समाजातील आरोग्यदूत म्हणायला हवे, असे प्रतिपादन वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक व्ही.एम. गोडबोले यांनी केले.महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ व आरोग्य प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने दोनदिवसीय वैदू साहित्य संमेलनाचे आयोजन देसाईगंज येथे करण्यात आले. या संमेलनाचा समारोप रविवारी झाला. याप्रसंगी ते बोलत होते. समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सहायक उपवनसंरक्षक सुनील कैंदलवार उपस्थित होते. दोनदिवसीय वैदू साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी सिंधू भवनात आ. कृष्णा गजबे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन डॉ. दिलीप सिंग यांच्या हस्ते झाले. पहिल्या दिवशी मानवता विद्यालयाच्या लेझीम पथकासह शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. या दिंडीचे पूजन जि.प. सदस्य रोशनी पारधी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर जितेंद्र कथाळे, अमित कुलकर्णी यांनीही यावेळी सहभाग घेतला. वृक्षदिंडी संमेलनात स्थिरावल्यानंतर वृक्ष प्रदर्शनी व जैवविविधता, सेंद्रिय शेती नमून्याचे स्टॉल लावण्यात आले. तसेच बीज संकलन व आत्माच्या तांदूळ विक्रीचे स्टॉल, वैदूंनी औषधींचे स्टॉल तसेच चरक फार्माचे स्टॉल लावण्यात आले. उद्घाटनानंतर जैवविविधता नोंदी व संवर्धनाचे घटक याविषयावर डी.पी. देशमुख यांनी माहिती दिली. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या रसशास्त्र विभागाचे डॉ. मनीष भोयर यांनी वैदू ज्ञान व आयुर्वेदिक चिकित्सा याविषयावर सादरीकरण केले. लोक जैवविविधता नोंदी व त्यातील अडचणींची चर्चा या परिसंवादात डॉ. अमित सेठीया व भीमसेन डोंगरवार यांनी माहिती दिली. वैदू साहित्यातील परंपरा या विषयावर वैदू पुंडलिक बुराडे, आसाराम दोनाडकर, हनुमंत नरोटे यांनी मत व्यक्त केले.रोग चिकित्सा करताना वैदूंनी लक्षणे व तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याविषयावर डॉ. मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. तसेच कर्करोग पूर्व तपासणी आणि तंबाखूचे दुष्परिणाम याविषयावर सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या शेवटी, वैदू, अभ्यासकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रेशीम नंदेश्वर यांनी केले. दोन दिवस वैदू साहित्य संमेलनात विविध कार्यक्रम पार पाडण्यात आले. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी डॉ. सूर्यप्रकाश गभणे, अर्चना गभणे, आरती पुराम व शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.जैवविविधता उद्यानाला भेट; परिसंवादरविवारी सकाळी वैदूंनी जैवविविधता उद्यानाला भेट दिली. याप्रसंगी उपवनसंरक्षक व्ही.एम. गोडबोले यांच्यासमवेत वैदूंनी औषधी वनस्पतींची माहिती व उपयुक्त वनस्पतींचे गुणधर्म याविषयी चर्चा केली. सेंद्रिय शेती, वनौषधी शेती उद्योग योजनेअंतर्गत आत्माचे महेंद्र दोनाडकर, डॉ. प्रदीप सौदागर, प्रताप पाटील यांनी माहिती दिली. जैवविविधता संवर्धनात प्रसार माध्यमांची भूमिका याविषयावर आयोजित परिसंवादात विष्णू दुनेदार, दिलीप कहुरके, राजरतन मेश्राम व प्रभाकर गोबाडे यांनी भाग घेऊन आपली मते मांडली.
वैदू हा समाजातील आरोग्यमित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 11:08 PM
कोणत्याही क्षणी गावातील आजारी व रोगग्रस्त तसेच शेवटच्या माणसाला औषधीचा लाभ देण्याचे पवित्र कार्य वैदू करतात.
ठळक मुद्देउपवनसंरक्षकांचे प्रतिपादन : देसाईगंजात गोंडवाना वैदू साहित्य संमेलनाचा समारोप