गडचिरोली जिल्हा बँकेला वैकुंठभाई मेहता पुरस्कार प्रदान; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत सन्मान सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 07:40 PM2020-02-11T19:40:15+5:302020-02-11T19:40:46+5:30
गडचिरोली जिल्हा सहकारी बँक ५५ शाखांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या दुर्गम भागापर्यत ४ लाख ३० हजार ग्राहकांना बँकिंग सेवा देत आहे. विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बँकेने आपली सेवा अधिक लोकाभिमुख केल्याने ग्रामीण नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळणे सुलभ झाले आहे.
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०१८-१९ या आर्थिक वर्षातील कै.वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराने सोमवारी (दि.१०) फेब्रुवारी रोजी सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा झाला.
गडचिरोली जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार व मुख्य व्यवस्थापक अरुण निंबेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जिल्हा सहकारी बँकांच्या श्रेणीमधून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार, तर सातारा जिल्हा सहकारी बँकेला द्वितीय आणि सिंधूदुर्ग सहकारी बँकेला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्टÑ राज्य सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष मुकूंद कळमकर, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती पांडे उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देशातील सहकार क्षेत्रात महाराष्ट्रात राज्याचा मोठा वाटा आहे. नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल भागातील नागरिक व शेतकºयांना कर्जपुरवठा करण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणाºया गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला, ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. राज्यातील काही जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. या बँकांनी गडचिरोली जिल्हा बँकेपासून धडा घेण्याची गरज असल्याचे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले. तसेच गडचिरोली जिल्हा बँकेची भक्कम आर्थिक स्थिती व तंत्रज्ञानाच्या वापराची त्यांनी प्रशंसा केली.
गडचिरोली जिल्हा सहकारी बँक ५५ शाखांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या दुर्गम भागापर्यत ४ लाख ३० हजार ग्राहकांना बँकिंग सेवा देत आहे. विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बँकेने आपली सेवा अधिक लोकाभिमुख केल्याने ग्रामीण नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळणे सुलभ झाले आहे.