एकाच क्रमांकाच्या पावत्या देऊन केला गैरव्यवहारवैरागड : येथील ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी ए. एन. डाखरे यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात सारख्याच क्रमांकाच्या तीन पावत्या वेगवेगळ्या व्यक्तींना देऊन रक्कम हडपली होती. याबाबतची तक्रार झाल्यानंतर ग्राम विकास अधिकारी ए. एन. डाखरे यांना २२ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. २०१५-१६ या वर्षातील दोन पावती बूक डाखरे यांनी गहाळ केली. भूखंड फेरफार करताना ९८ हजार रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला होता. हे चौकशीत स्पष्ट झाले होते. तरीही डाखरे यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात होती. लोकमतने सदर प्रकरण लावून धरले होते. डाखरे यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. त्यांना निलंबन कालावधीत पंचायत समिती एटापल्ली मुख्यालयात पाठविले आहे. पुढील आदेशापर्यंत वैरागड ग्रामपंचायतचा कारभार सिर्सी येथील ग्रामसवेक डी. जे. ठाकरे यांच्याकडे सोपविला आहे. डाखरे यांच्यावरील कारवाईचे ग्रा.पं. सदस्य पांडुरंग बावणकर, वसुधा तावेडे, रामभाऊ नंदरधने, रामकृष्ण खरवडे, महेंद्र तावडे, सुभाष बरर्डे, दिनकर लोथे, डोनूजी कांबळे, जगदिश पेंद्राम यांच्यासह वैरागडवासीयांनी स्वागत केले आहे.डाखरे यांच्या निलंबनाबाबत आरमोरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी सज्जनपवार यांना प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेटून विचारणा केली असता, माहिती कशाला पाहिजे, निलंबन झाले तर झाले. अशी माहिती किंवा पत्राची झेरॉक्स देता येत नाही, असे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली. (वार्ताहर)
वैरागडचे ग्राम विकास अधिकारी निलंबित
By admin | Published: March 24, 2017 1:00 AM