ध्वनी प्रदूषणात वाढ
देसाईगंज : वाहनांवर कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी आहे. असे असतानाही काही तरुण मोठ्या प्रमाणात दुचाकीवर हॉर्न लावून वाजवितात. त्यामुळे अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सांडपाणी अडल्याने आरोग्य धोक्यात
आरमाेरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
प्रसाधनगृह नसल्याने महिलांची कुचंबणा
चामाेर्शी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही प्रवाशी निवाऱ्याजवळ प्रसाधनगृह नसल्याने तसेच ज्या ठिकाणी आहे तिथे सर्वत्र अस्वच्छता असल्याने महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी महिला प्रवाशांनी केली आहे.
जळाऊ लाकूड उपलब्ध करून द्यावे
अहेरी : जंगल परिसरात असणारे ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडांचा उपयोग करतात. पण, वन कायद्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. हा प्रश्न सोडविण्याची अशी तालुक्यातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.
सर्पमित्रांना विमा कवच देण्याची मागणी
सिराेंचा : नागरिकांचे प्राण वाचविण्याच्या प्रयत्नात सर्पमित्र स्वत:चे प्राण धोक्यात घालून सापांना सुरक्षित जंगलात सोडतात. पर्यावरण व वन्यजीवांचे संरक्षण करण्यात सर्पमित्रांचे योगदान मोठे आहे.
शहरात वाहतुकीची काेंडी
देसाईगंज : शहरातील वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेकजण आपले वाहन रस्त्याच्या कडेला लावत असल्याने काही भागामध्ये वाहतूक कोंडी नित्याचीच झाली. मार्ग काढताना नागरिक त्रस्त होत आहेत. ओव्हरलाेड वाहनाच्या आवागमनाने रहदारी विस्कळीत हाेत आहे.
बीएसएनएलची सेवा कुचकामी
झिंगानूर : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडच्या वतीने सिराेंचा तालुक्याच्या झिंगानूर भागात दूरसंचार सेवा दिली जाते. मात्र गेल्या काही महिन्यापासून कव्हरेजची समस्या माेठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने भ्रमणध्वनीधारकांचा एकमेकांशी संपर्क हाेत नाही. परिणामी बीएसएनएलची सेवा या भागात कुचकामी ठरली आहे.
भामरागड तालुक्यातील गावे लाईनमन अभावी
भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपांना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युतपुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एका लाईनमकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे ते प्रत्येक गावी सारखा वेळ देऊ शकत नाहीत.
तुटलेले साईन बोर्ड दुरुस्त करा
सिराेंचा : तालुक्यातील मुख्य मार्गावर बऱ्याच ठिकाणी शहरातील स्थानाबाबत साईन बोर्ड लावण्यात आले आहे. मात्र ते अनेक ठिकाणी तुटले आहेत. त्याची त्वरित दुरुस्ती करावी. अनेक फलकावर लिहिले अक्षरे मिटल्याने अडचण जाते. त्यामुळे गावाचे नाव अंकित करावे, अशी मागणी होत आहे.
पुस्तकसाठा उपलब्ध करण्याची मागणी
गडचिराेली : ग्रामीण भागात शासकीय अनुदानावर ग्रंथालये सुरू आहेत. मात्र या ग्रंथालयात पाहिजे त्या प्रमाणात ग्रंथसाठा उपलब्ध नाही. ग्रंथालयाला शासनाकडून तोडके अनुदान मिळत असल्याने त्यांना ग्रंथ खरेदीसाठी अडचण जाते. त्यामुळे पुस्तकसाठा उपलब्ध करावा, अशी मागणी आहे.
घरपट्टे मिळण्यास विलंब
गडचिरोली : शहरात गोकुलनगर, रामनगर, इंदिरानगर, विवेकानंदनगर, या परिसरात अतिक्रमण करून हजारो कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र अद्यापही जागेचे पट्टे देण्यात आले नाहीत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर बांधकामासाठी स्वत:च्या मालकीची जागा असणे गरजेचे आहे.
फळ दुकानांची तपासणी करा
वैरागड : विविध प्रकारची फळे कृत्रिमरित्या कॅल्शिअम कार्बाईडने पिकविली जात असून अशा फळांची गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे. असे फळ खाल्ल्यामुळे आरोग्य धोक्यात आहे.
बहुतांश कार्यालयातील बायोमेट्रिक मशीन बंद
धानोरा : शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. अनेक कार्यालयांतील मशीन बंद आहेत.
कोटगूल येथे आयटीआय मंजूर करा
कोरची : कोटगूल येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंजूर करून या भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोत्तागुडम पुलाचे बांधकाम करा
अहेरी : व्यंकटापूर-अहेरी राज्य महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या कोत्तागुडाम पुलाचे बांधकाम अजूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे नागरिकांना आवागमन करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुलाच्या बांधकामात खंड पडला आहे. व्यंकटापूर परिसरातील नागरिकांना अहेरी येथे येण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने या पुलाचे बांधकाम करावे.
बेरोजगार भत्ता लागू करा
देसाईगंज : जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोजगाराची कुठलीही व्यवस्था संबंधित विभागाने केली नाही. त्यामुळे बेरोजगारांमध्ये नैराश्य पसरले आहे. शासनाने बेरोजगारांसाठी सुरू केलेली कर्ज योजना मृगजळ ठरत असल्याचे दिसून येत आहे.
एटापल्लीत डासांचा प्रादुर्भाव वाढला
एटापल्ली : मागील काही दिवसांपासून डास व किटकांचा त्रास वाढला आहे. अनेकदा रात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने डासांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे फवारणी करण्याची मागणी केली आहे.