लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने बेजूर गावातील ४२ आदिवासी महिला व पुरूषांना अभ्यासदौऱ्यासाठी शहरी भागात पाठविण्यात आले होते. तीन दिवशीय अभ्यास दौरा आटोपून बेजूरवासीय स्वगावी परतल्यानंतर त्यांनी या अभ्यास सहलीतून आलेले अनुभव लोकांपुढे कथन केले. दरम्यान मोठमोठ्या शहरात यशस्वी झालेले व पाहून आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या गावात राबविणार, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.१७ ते २९ सप्टेंबरदरम्यान बेजूरपल्लीतील ४२ आदिवासी नागरिकांनी तीन दिवसाचा अभ्यासदौरा केला. यामध्ये १२ महिला, २९ पुरूष व एक सहा वर्ष वयाच्या मुलीचा समावेश होता. ६ ते ६० वर्ष वयोगटातील आबालवृध्द आदिवासी नागरिकांनी अभ्यासदौऱ्यातून मिळालेले अनुभव कथन केले. वरोरानजीकच्या आनंदवन येथील कापड गिरणी, अंध अपंगांची शाळा, विविध वस्तूंची निर्मिती करणारे बोट नसलेले हात व हात नसलेले शरीर, तरीही उद्योगी व सर्वांच्या चेहºयावर असणारा आनंद बघून आम्ही भारावून गेलो, असे अभ्यासदौºयातील आदिवासींनी सांगितले. आनंदवनातील विविध उपक्रमातून आम्हाला प्रेरणा मिळाली. अशोकवनातील चंदनाची शेती व मिलिया डुबीया वनस्पतीची शेती पहिल्यांदा आम्ही बघितली.अभ्यासदौऱ्यादरम्यान नागपूर येथील दीक्षाभूमी, गोवारी शहीद स्मारक यांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली. इंग्रजांच्या काळातील बंगला व तेथील अजब प्राचीन वस्तू बघून आम्हाला आमच्या आदिवासी संस्कृतीचे दर्शन झाल्याची प्रचिती आली, असे नागरिकांनी सांगितले. क्रिकेट स्टेडीयम, लोकमत भवन, रिजर्व बँक ईमारत, हायकोर्ट बंगला, रेल्वे स्टेशन, विमानतळ, रस्त्यावरील भरगच्च वाहतूक, लोकांची वर्दळ, मेट्रो हे सारे पाहताना मनात धाकधुक होती; मात्र लोकबिरादरी प्रकल्पातील राहुल भसारकर व मुंशी दुर्वा यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला कसलाही त्रास झाला नाही. मेट्रोच्या डब्ब्यात बसल्याचा आनंद आम्ही कधीही विसरू शकणार नसल्याचे बेजूरवासीयांनी सांगितले.सोमनाथ प्रकल्पातील टायर बंधारा व सिमेंट बंधारा बघून आपणही आपल्या गावाजवळील नाल्यावर असा बंधारा बांधण्याचा मनोदय व्यक्त केला. सोमनाथ प्रकल्पातील शेती व विविध तलाव बघून शेती विकासाचा प्रत्यय आला. एकंदरीत या अभ्यास दौऱ्यात खऱ्या अर्थाने आधुनिकतेची ओळख झाली. न पाहिलेले विश्व बघितले. न भेटलेली माणसे, न अनुभवलेले प्रसंग पाहिले. कृषी क्षेत्रातील प्रगती बघितली. आनंदवनातील दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील आनंद बघितला असल्याचे यावेळी सांगितले.चैतू रामा तेलामी, दौलत विज्जा दुर्वा, मनोज रामजी पुंगाटी, बाजू अमलू आत्राम, मुंशी देवू दुर्वा, चिन्ना कुंडी आत्राम, सैनू जुरु दुर्वा, सुधीर लालू आत्राम, दानू दसरु आत्राम, कुम्मा रामा तेलामी, मंगरु लालसू दुर्वा, शिवाजी चमरू तेलामी, राजू चुक्कू मुडमा, चिन्ना तेलामी, भिमा आत्राम, पुसू मुडमा, चैते भिका मुहुंदा इत्यादींनी अनुभव कथन केले. यावेळी प्रकल्पातील कार्यकर्ते अशोक गायकवाड उपस्थित होते.पुन्हा चार गावातील आदिवासींचा निघणार अभ्यास दौराबाबांनी स्वाभिमानाने जगण्याची उमेद कुष्ठरोग्यांमध्ये जागविली. त्यामुळे आनंदवन उभे राहिले. आदिवासी बांधवांना यातून प्रेरणा मिळावी, त्यांचा आनंद द्विगुणीत व्हावा हा या मागे हेतू आहे. आदिवासिंच्या चेहऱ्यावरील आनंद आम्हाला काम करण्यास उत्साहीत करतो. मागील वर्षी मडवेली-जिंजगावच्या आदिवासींचा अभ्यास दौरा काढण्यात आला होता. यावर्षी बेजूरनंतर आता दर्भा, कुमरगुडा, टेकला, व नारगुंडा या गावातील आदिवासी बांधवांचा अभ्यास दौरा दिवाळीपर्यंत आयोजित करणार असल्याचा आशावाद लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी व्यक्त केला.
आपल्या गावात राबविणार विविध नाविन्यपूर्ण उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:38 AM
हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने बेजूर गावातील ४२ आदिवासी महिला व पुरूषांना अभ्यासदौऱ्यासाठी शहरी भागात पाठविण्यात आले होते. तीन दिवशीय अभ्यास दौरा आटोपून बेजूरवासीय स्वगावी परतल्यानंतर त्यांनी या अभ्यास सहलीतून आलेले अनुभव लोकांपुढे कथन केले.
ठळक मुद्देबेजूरवासीयांचा निर्धार : लोकबिरादरीत कथन केले सहलीतील अनुभव, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडल्याच्या व्यक्त केल्या भावना