देसाईगंज : येथील समाजसेवक, गुरूदेवभक्त, आदिवासी सेवक वसंतराव गणपत कदम यांचे गुरूवारी पहाटे ४.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८५ वर्षांचे होते. आदिवासी व दुर्गम भागात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मानवतावादी, परिर्वतनवादी विचारांचा प्रचार व प्रसार त्यांनी केला. त्यांना राष्ट्रसंतांचा सहवास लाभला होता. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देसाईगंज येथे पाचारण करण्याचे तसेच राष्ट्रसंतांच्या महानिर्वाणानंतर देसाईगंजात सर्वप्रथम लोकसहभागातून सामूदायिक प्रार्थना मंदिर उभारण्याचे काम वसंतराव कदम यांनी केले. ते भजनप्रेमी होते. तसेच काही काळ अखिल भारतीय श्री गरूदेव सेवा मंडळाचे मध्यवर्ती सदस्यही राहिले. विविध सेवा सहकारी संस्था तसेच सामाजिक संस्थांशीही त्यांचा संबंध राहिला. निस्पृह जीवन जगताना त्यांनी कुठलीही संपत्ती गोळा केली नाही. या सेवाकार्याची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार देऊन सन्मानित केले. निधनाबद्दल त्यांच्या चाहत्यांनी तसेच श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. देसाईगंज येथील स्मशानभूमीत गुरूवारी दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी माजी खा. मारोतराव कोवासे, माजी आ. शिंगाडे, माजी आ. हरिराम वरखडे, हिरा मोटवाणी, डॉ. पापडकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, दलितमित्र नानाजी वाढई, प्रभात दुबे, विलास ढोरे, भाऊराव पत्रे व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
वसंतराव कदम यांचे निधन
By admin | Published: March 24, 2017 1:19 AM