गडचिराेली : लोकसभा निवडणुकीचे मतदान आणि त्यासाठी असलेल्या सुट्टीमुळे सकाळपासून शहरातील बाजारपेठ, भाजीमंडईमध्ये शुक्रवारी शुकशुकाट दिसून आला. इंदिरा गांधी चाैकासह बहुतांश चौक आणि रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याने मुख्य व अंतर्गत रस्ते ओस पडले होते.
गडचिराेली शहर व तालुक्यात मतदानावेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांमध्ये चुरस दिसून आली. सकाळी साडेसात वाजतापासून मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शासनाने भरपगारी सुट्टी दिल्याने गडचिराेली जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शहरात नोकरी, रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या तुरळक होती. तापमानाचा पारा ४० अंशावर असल्याने अनेकांनी दुपारी दोनपूर्वी मतदान करण्याला पसंती दिली. बहुतांश जणांनी मतदान करणे आणि त्यानंतर घरी थांबण्याला प्राधान्य दिले; त्यामुळे मुख्य बाजारपेठ, भाजीपाला बाजार तसेच अनेक ठिकाणच्या चाैक परिसरात शुकशुकाट दिसून आला. बहुतांश व्यावसायिकांनी कामगारांना सुट्टी दिल्याने दुकाने बंद ठेवली. गडचिराेली शहरात दुपारच्या सुमारास काही माेजकी लहान दुकाने सुरू हाेती. ९० टक्के दुकाने बंद हाेती.