दुरूस्तीकडे दुर्लक्ष : रस्त्याच्या दुरवस्थेने वाहनधारक कमालीचे त्रस्त आलापल्ली : जिल्हा निर्मितीच्या ३४ वर्षानंतरही गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी उपविभागातील अनेक मुख्य रस्त्याची खस्ता हालत आहे. शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अहेरी उपविभागातील रस्ते पूर्णत: बकाल झाले आहेत. विशेष म्हणजे आलापल्ली-वेलगूर मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. मागील पावसाळ्यात १४ सप्टेंबर २०१६ रोजी वेलगूर-आलापल्ली मार्गाच्या दुरूस्तीच्या मागणीला घेऊन चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी संपूर्ण रस्ता हा खंडेमय होता. जन आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनाने त्यावेळी या मार्गाची तात्पुरती दुरूस्ती केली होती. दिवाळीनंतर या रस्त्याची पक्की दुरूस्ती करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र अद्यापही या रस्त्याच्या पक्क्या दुरूस्तीच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात दुरूस्त केलेला रस्ता आता पूर्णत: उखडला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना खड्डे चुकविताना दमछाक होत आहे. वेलगूर वळण ते बोटलाचेरू तलावापर्यंतच्या रस्ता कामासाठी १० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच बोटलाचेरू ते मैलाराम दरम्यानच्या रस्त्याचे काम करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्रा या दोन्ही रस्त्याच्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही. (वार्ताहर) चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा बोटलाचेरू तलावाजवळ रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे येथे अनेकदा वाहनाला अपघात घडत आहे. या मार्गासह वेलगूर-आलापल्ली मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन या मार्गाची तत्काळ दुरूस्ती करावी, अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा वेलगूर, नवेगाव, बोटलाचेरू, शंकरपूर, मैलाराम, वेलगूर टोला येथील नागरिकांनी दिला आहे.
वेलगूर मार्ग खड्डेमय
By admin | Published: February 16, 2017 1:57 AM