अहेरी : अंगणवाडी सेविकेची निवड करण्याच्या मुद्यावरून वेलगूर ग्राम पंचायतीची विशेष ग्रामसभा १५ सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली. या विषयावर कोणताही निर्णय न झाल्याने गोंधळ उडाला होता. व या गोंधळातच सभा स्थगित करण्यात आली. २ सप्टेंबर रोजी पहिली ग्रामसभा स्थगित झाली होती. १५ सप्टेंबरच्या सभेची ही सुरूवात वादळी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी आत्माराम गदेकर होते. मात्र सूचकाने त्यांचे नाव सूचविले नाही, असा आक्षेप घेताच अध्यक्ष म्हणून राजेश्वर उत्तरवार यांची निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेसाठी कोणती पद्धत अवलंबायची यावर प्रचंड खल झाला. अखेरीस ईश्वरचिठ्ठी पद्धतीवरही एक मत होऊ न शकल्याने सभा तहकूब करण्यात आली. पुढील ग्रामसभा २१ सप्टेंबर रोजी घेण्याचे ठरविण्यात आले आहे. अंगणवाडी सेविकेची निवड प्रक्रिया ग्रामसभेद्वारा न करता वरिष्ठ पातळीवरून निवड करावी, अशी मागणी अर्जदार व नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
वेलगूरची ग्रामसभा दुसऱ्यांदा स्थगित
By admin | Published: September 17, 2015 1:47 AM