दिलीप दहेलकर गडचिराेली : भामरागड तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील कृष्णार येथील गणेश लालसू तेलामी या २३ वर्षीय अविवाहित युवकाचा क्षयराेगाने मृत्यू हाेऊन त्याला रूग्णवाहिका न मिळाल्याबाबतचे वृत्त ‘लाेकमत’मध्ये झळकताच आराेग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. दुसऱ्या दिवशी जिल्हा व तालुकास्तरावरील चमूने थेट कृष्णार गाव गाठून सदर मृत्यू प्रकरणाबाबतची सत्य परिस्थिती जाणून घेतली असता विदारक वास्तव उजेडात आले. गणेश तेलामी याने तब्बल तीन महिने पुजाऱ्यांकडून गावठी उपचार घेतला. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर लाेकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. येथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
अहेरी उपविभागाच्या दुर्गम भागात अजुनही आदिवासी समाजामध्ये अंधश्रद्धा व अज्ञान आहे. तालुकास्तर व माेठ्या गावापर्यंत शासकीय आराेग्य सेवा पाेहाेचली असली तरी या भागातील अनेक लाेक अज्ञानामुळे रूग्णालयात जाऊन औषधाेपचार करीत नाही. असाच प्रकार गणेश तेलामी याच्याबाबत घडला. तीन महिन्याआधीपासून गणेशची प्रकृती बिघडली. दरम्यान, ताे स्वत: किंवा कुटुंबियांनी शासकीय व काेणत्याही खासगी रूग्णालयात जाऊन औषधाेपचार घेतला नाही. गावठी उपचारावर पूर्णत: निर्भर राहिला. अहेरी- भामरागड दरम्यान असलेल्या बांडियानगर येथे पुजाऱ्याकडे जाऊन तब्बल तीन महिने गणेशने गावठी उपचार घेतला. परिणामी प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडली. पाेटदुखी, अतिसार, ताप आदी त्रास हाेऊ लागला. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर त्याला कुटुंबियांनी हेमलकसाच्या लाेकबिरादरी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. येथे गणेशला १७ जुलैला भरती करण्यात आले. १९ जुलैला ताे क्षयराेग पाॅझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. उपचारादरम्यान त्याचा २० जुलैला मृत्यू झाला.
गणेशने पुजाऱ्यांकडून गावठी उपचार घेतला. प्रकृती गंभीर झाल्यावर त्याला लाेकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात दाखल केले, अशी माहिती मृतक गणेशचा लहान भाऊ दिलीप लालसू तेलामी यांच्याकडून मिळाली. गणेशची प्रकृती बिघडल्याबाबतची थाेडीशीही माहिती आराेग्य कर्मचाऱ्यांना नव्हती. आज घरी भेट देऊन चौकशी केल्यावर हा प्रकार समोर आला.- डाॅ. भूषण चाैधरी, तालुका आराेग्य अधिकारी, भामरागड
पाेलिसांच्या मदतीने दिली शववाहिकागंभीर रूग्णांना ने-आण करण्यासाठी शासकीय व खासगी रूग्णालयामार्फत रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते. मात्र मृतदेहाला नेण्यासाठी रूग्णवाहिका दिली जात नाही. त्यासाठी शववाहिका देण्याची तरतूद आहे. लाेकबिरादरी दवाखान्यातून दुचाकीवर खाट बांधून त्यावर मृतदेह आणताना तेलामी कुटुंबिय पाेलिसांना दिसले. दवाखान्यापासून एक किमी अंतरावर आल्यावर भामरागड पाेलिसांनी त्यांना अडविले. तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. भूषण चाैधरी यांना माहिती देताच ते त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे संपर्क साधून शववाहिका बाेलाविली व त्यातून मृतदेह पाठवला, अशी माहिती तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. चाैधरी यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली.
या कारणामुळे झाला मृत्यूगणेशला ताप हाेता. वजन व रक्त फार कमी हाेते. रक्त केवळ ७.८ ग्रॅम हाेते. त्याला रक्ताची गरज हाेती. त्याला पाेटदुखी, अतिसाराचा त्रास हाेता. मात्र पुजाऱ्याकडे उपचार करण्यात वेळ दवळल्याने त्याला प्राणाला मुकावे लागले. याच कारणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आराेग्य विभागाने व्यक्त केला आहे. कधी आंध्रप्रदेश, कधी पेरमिली आदी ठिकाणी राहून ताे काम करायचा. त्यामुळे ताे आराेग्य कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला नाही.