गडचिराेली : मागील एक वर्षापासून काेराेना संसर्गाचे संकट असल्याने सर्वसामान्य लाेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बेराेजगारी वाढत आहे. यातच लाेकांचे उत्पन्न घटले आहे. तरीसुद्धा केंद्र शासनाने पेट्राेल, डिझेल व गॅसची दरवाढ करून सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चाेळले आहे. केंद्र शासनाचे धाेरण अन्यायकारक आहे, असा आराेप करीत विदर्भ राज्य आंदाेलन समितीने इंधन दरवाढीबद्दल केंद्र शासनाचा निषेध नाेंदविला.
विदर्भ राज्य आंदाेलन समितीने १६ जूनला संपूर्ण विदर्भातून पंतप्रधान व पेट्राेलियम मंत्र्यांना निवेदन पाठविले. गडचिराेली येथे जिल्हा समन्वयक अरूण मुनघाटे, रमेश उप्पलवार, रमेश भुरसे, एजाज शेख, बाळू मडावी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले तर अहेरी येथे विलास रापर्तीवार, नागसेन मेश्राम, दीपक सुनतकर, चामाेर्शी येथे अशाेक पाेरेड्डीवार, हनुमंत डंबारे, कृष्णा नैताम, कुरखेडा येथे राजेंद्रसिंह ठाकूर, देसाईगंज येथे नसिरजुम्मन शेख, आरमाेरी येथे शालिक नाकाडे व मुलचेरा येथे बादलशहा यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले.