आॅनलाईन लोकमतगडचिरोली : वनविभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती चांदाळाच्या वतीने गडचिरोली येथे मोह सरबत व जामचे उत्पादन केले जात आहे. औषधी गुणधर्म असलेले सरबत व जाम नागरिकांमध्ये लोकप्रिय होत चालले असल्याने या उत्पादनांनी विदर्भाची बाजारपेठ व्यापण्यास सुरूवात केली आहे. विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणांवरून मागणी केली जात आहे.गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. या झाडाचे अनेक उपयोग असल्याने या झाडाला जिल्ह्यात कल्पवृक्ष मानले जाते. मोहफुलांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू निर्मिती केली जात असल्याने सदर कल्पवृक्ष बदनाम झाले होते. मात्र याच मोहफुलांपासून अनेक पदार्थ निर्मितीचे संशोधन येथील वनविभागाने केले. त्यानंतर ६ जानेवारी २०१२ रोजी गडचिरोली येथे मोहफूल प्रक्रिया केंद्र स्थापन करून सरबत व जामचे उत्पादन सुरू केले. मात्र खऱ्या अर्थाने बाजारपेठ व्यापण्यास मागील दोन वर्षापासून गती मिळाली आहे. मोहफूल प्रक्रिया केंद्रात सध्या स्थितीत १७ मजूर कार्यरत आहेत. या मजुरांकडून दर दिवशी सुमारे दोनशे लिटर सरबत तयार केले जात आहे.गावातील नागरिकांकडून मोहफूल खरेदी केले जात असल्याने त्यांनाही चांगली किंमत मिळत आहे. मागील सहा वर्षांच्या कालावधीत सुमारे ३३ लाख रूपयांच्या जाम व सरबतची विक्री झाली असून ५ हजार ७३१ मनुष्य दिवस रोजगार निर्मिती झाली आहे. विदर्भानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रत सरबत व जाम पाठविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांनी दिली आहे. मोहफूल सरबतची ३५० मिलीलिटरच्या बॉटलची किंमत ७० रूपये व १ लिटरच्या बॉटलची किंमत १७५ रूपये आहे. एका बॉटलच्या सरबतमध्ये दोन बॉटल पाणी टाकून एकून तीन लिटर सरबत तयार होते.शंभर ग्रॅम जामची किंमत ४० रूपये आहे. बाजारातील इतर पदार्थांपासून बनलेल्या सरबत व जामच्या तुलेनेत मोहफुलाचे सरबत व जाम स्वस्त व चवीने चांगले असल्याने नागरिकांच्या पसंतीस उतरत आहेत. विशेष म्हणजे वनविभाग या शासकीय यंत्रणेच्या नियंत्रणात सरबत व जामचे उत्पादन होत असल्याने त्याच्यामध्ये कोणतेही रासायनिक द्रव्य मिसळविण्यात आले नसल्याचा विश्वास ग्राहकांना आहे.सदर प्रकल्प मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू. आय. एटबॉन, गडचिरोलीचे उपवनसंरक्षक एस. बी. फुले यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या नियंत्रणात सुरू आहे.मोहफुलांमधील औषधी गुणधर्ममोहफुलांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फॅट, फायबर, कारबोहायड्रेट व कॅलोरीज आहेत. मोहफुलाच्या सरबरत व जामची चव सहदाप्रमाणे आहे. मधुमेह, मुळव्याध, हृदयरोग, संधिवात व त्वचेचे विकार दूर करण्याचे गुणधर्म आहेत. त्याचबरोबर वात-पित्त शामक, काम शक्तीवर्धक, डोकेदुखीकरिता लाभदायक, उत्तम मलसारक, पोटातील रोगांकरिता लाभदायक, खोकला, उचकी पासून मुक्ती, कुष्टरोगासारख्या चर्मरोगांकरिता प्रभावशाली, स्तनवृध्दीकारक, दातांमधील रक्तस्त्राव बंद करण्याकरिता लाभदायक आहे. मोहाचे तेल इंधनाच्या स्वरूपात वापरले जाते. औषधी गुणधर्म असल्याने मोहफूल जाम व सरबताची मागणी वाढत आहे.औषधी गुणधर्माबरोबरच विलक्षणीय सुगंध व चव असलेल्या मोहाफुल जाम व सरबताची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्य:स्थितीत दरदिवशी दोनसे लिटर सरबताचे उत्पादन केले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोहाफुलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यांना योग्य भाव मिळावा तसेच जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी या प्रकल्पाचा व्याप आणखी वाढविला जाणार आहे. बेरोजगार युवक, बचत गट व दुकानदारांना डिलरशीप देण्याचा प्रयत्न आहे. जाम व सरबतचे पेटंट वनविभाच्या नावाने करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जाम व सरबत यांच्या यशस्वितेनंतर आता सुखामेवा व चुर्ण तयार करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू असून उत्पादन लवकरच सुरू होणार आहे. बेरोजगार युवकांना सरबत व जाम विक्रीतून रोजगाराची नामी संधी उपलब्ध होणार आहे.- सोनल भडके, सहायक वनसंरक्षक वन विभाग, गडचिरोली
मोह सरबत व्यापतोय विदर्भाची बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 8:47 PM
वनविभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती चांदाळाच्या वतीने गडचिरोली येथे मोह सरबत व जामचे उत्पादन केले जात आहे.
ठळक मुद्देगडचिरोली वन विभागाचा उपक्रम : दरदिवशी २०० लिटरचे उत्पादन; मागील सहा वर्षांत ३३ लाखांचे उत्पादन