विद्यार्थ्यांनी मांडली मते : आलापल्लीत आंतर महाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धा आलापल्ली : स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय जिल्ह्याचा विकास होणार नाही, ही भूमिका स्पष्ट करीत शालेय विद्यार्थ्यांनी आलापल्ली येथे वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीला साद घालत आपापली मते मांडली. राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालयात मंगळवार ३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी वेगाने विदर्भ राज्य काळाची गरज’ या विषयावर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण लोखंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. मोहुर्ले उपस्थित होत्या. आंतरमहाविद्यालीयन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत असलेली आपापली भूमिका व मते मांडली. स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय या भागाचा विकास शक्य नाही, असे मत मांडले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कडूकर एस. पी. महाविद्यालय चंद्रपूर, द्वितीय क्रमांक सोनानी नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी तर तृतीय क्रमांक अभिषेक मोहुर्ले राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली यांनी प्राप्त केला. स्पर्धेचे परिक्षण प्राचार्य सोनवणे, दुगेर्जी, मिलिंद खोंड यांनी केले. सुयशप्राप्त विद्यार्र्थ्यांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. प्राचार्य डॉ. अरूण लोखंडे यांच्या मार्गदर्शनात यशस्वीतेसाठी प्रा. भगीरथ येंबडवार, प्रा. प्रकाश घोडमारे, प्रा. डॉ. माधुरी भुडे, प्रा. डॉ. अरुण लाडे, प्रा. डॉ. नीरज खोब्रागडे, प्रा. रवी ढवळे, प्रा. राजुरकर, प्रा. कु. गंपावार, प्रा. मद्दीवार, प्रा. गुळघाने, नामदेवजी धोटे, हरी दाते, मनोज खोब्रागडे, प्रदीप तलांडे, पुनम खांडरे, राजु चुधरी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)
वक्तृत्त्वातून वेगळ्या विदर्भाची साद
By admin | Published: January 05, 2017 1:40 AM