गडचिरोली : दिवसभर 400 किलोमीटरचा प्रवास करून संध्याकाळी दैनिक तपासणीसाठी आगारात दाखल झालेल्या एका एसटी बसने अचानक पेट घेतल्याने एकच धावपळ झाली. एसटी कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत बसची आग विस्तारण्यापासून रोखल्याने मोठी हानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली आगाराची एक बस रविवारी दिवसभरातील फेऱ्या पूर्ण करून आष्टी येथून संध्याकाळी 7 च्या सुमारास आगारात परतली. प्रवाशांना उतरविल्यानंतर बसमध्ये डिझेल भरून चालकाने बस दैनंदिन तपासणीसाठी रांगेत लावली. याच वेळी बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. लगेचच धोक्याची सूचना देत आजूबाजूच्या 17 ते 18 बसगाड्या तेथून दूर करण्यात आल्या.
गडचिरोली नगर परिषदेचे अग्निशमन वाहन थोडे उशिरा पोहोचल्याने गाडीतील आग पसरून सर्व सीट जळाल्या. परंतू कर्मचाऱ्यांना ही आग गाडीच्या डिझेल टँकपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आगार व्यवस्थापक पांडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. या आगीत बसचा वरील भाग जळला असून इतर कोणत्याही वाहनांची हानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.