मनोज ताजने लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी सुरू झाली आहे. भाजपशी निवडणूकपूर्व युती होणार नाही हे गृहित धरून सेनेकडून सर्व मतदार संघांमध्ये संभावित उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. काही ठिकाणी विदर्भ संपर्क प्रमुख तथा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यामार्फत सर्व दृष्टीने ‘सक्षम’ ठरणाऱ्या संभावित उमेदवारांचे ‘मातोश्री’वर हजेरी लावणेही सुरू झाले आहे.विदर्भातील काही मतदार संघ नेहमीसाठी विशिष्ट प्रवर्गासाठी राखीव आहेत. काही ठिकाणी त्या प्रवर्गातील योग्य उमेदवार पक्षाकडे नसल्याने सक्षम उमेदवारांचा शोध घेऊन त्याच्या गळ्यात शिवसेनेकडून उमेदवारीची माळ घातली जाणार आहे. मतदार संघात जनसंपर्क ठेवण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर न करता त्यांना कामी लागण्याची सूचना दिली जात आहे.२०१४ च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लोकसभा व विधानसभा निवडणूक लढल्यानंतरही विदर्भात सेनेला लोकसभेच्या ४ आणि विधानसभेच्या ४ जागांवर यश मिळाले होते. त्यापैकी भावना गवळी (वाशिम), आनंदराव अडसूळ (अमरावती) आणि प्रतापराव जाधव (बुलडाणा) हे तीन खासदार, तसेच संजय राठोड (दारव्हा), डॉ.संजय रायमुयलकर (मेहकर) आणि डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेडराजा) हे तीन आमदार पश्चिम विदर्भातील आहेत. त्या तुलनेत पूर्व विदर्भात लोकसभेवर कृपाल तुमाने (रामटेक) आणि विधानसभेवर सुरेश (बाळू) धानोरकर (वरोरा) हे दोघेच निवडून गेले होते. पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख म्हणून दिवाकर रावते अनेक वर्षांपासून काम पाहात आहेत. या भागात सेनेला मिळालेले यश हे रावतेंच्या मार्गदर्शनातूनच मिळाल्याचे मानून आता पूर्व विदर्भाचीही जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पूर्व विदर्भातील जिल्ह्यात शिवसेनेच्या पक्षबांधणीत काही बदल होऊन निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना हटविले जाण्याची शक्यता आहे.पश्चिम विदर्भात दिवाकर रावते यांनी गेल्या १५ वर्षात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक मोर्चे, आंदोलने करून जनमानसाला सेनेशी जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पूर्व विदर्भातही शेतकऱ्यांसोबतच ओबीसींच्या प्रश्नांवर पदाधिकाऱ्यांना आक्रमक होण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. मात्र या आंदोलनांमध्ये पाहीजे तसा जीवंतपणा कमी आणि दिखाऊपणाच अधिक असल्याने पूर्व विदर्भ काबिज करण्याचे सेनेचे प्रयत्न कितपत यशस्वी होईल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेकडून विदर्भात सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:33 PM
पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी सुरू झाली आहे. भाजपशी निवडणूकपूर्व युती होणार नाही हे गृहित धरून सेनेकडून सर्व मतदार संघांमध्ये संभावित उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
ठळक मुद्देस्वतंत्रपणे लढण्याची तयारी रावते करणार वातावरण निर्मिती