नागरिक दहशतीत : रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढलीविसोरा : देसाईगंज तालुक्यातील विसोरा-एकलपूर मार्गावर बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकलपूर हे गाव विसोरापासून उत्तरेस दोन किमी अंतरावर आहे. एकलपूरवरून पुढे कोरेगाव मार्गे गोंदिया जिल्ह्यात जाता येते. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. विसोरा, देसाईगंज येथे सुध्दा एकलपूर परिसरातील लहान गावांमधील शेकडो विद्यार्थी, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते दररोज विसोरा, देसाईगंज, ब्रह्मपुरी येथे जातात. एकलपूर ते विसोरा दोन किमीचे अंतर वळणाचे असून रस्त्याच्या दुतर्फा गवत व झाडा झुडूपांच्या फांद्या पसरल्या आहेत. त्यामुळे रस्ता अरूंद झाला आहे. दोन चारचाकी वाहनांना अत्यंत काळजीने एकमेकांना क्रॉस करावे लागते. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठमोठी झुडूपे वाढली असल्याने रस्त्याच्या बाजुचे काहीच दिसत नाही. त्यामुळे या दोन किमीच्या मार्गावरून जाताना जंगलातून गेल्याचा भास निर्माण होतो. याच परिसरात बिबट्याचे दर्शन मागील काही दिवसांपासून होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)
विसोरा परिसरात बिबट्याचे दर्शन
By admin | Published: November 11, 2016 1:21 AM