पूल व रस्त्यांचे काम सुरू : अनेक वर्षानंतर मिळाला निधी; एसटी महामंडळाची बसही सुरू होणार श्रीधर दुग्गीरालापाठी कमलापूर अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरातील गावांमध्ये अनेक विकासकामे केली जात आहेत. ही विकासकामे पूर्ण झाल्यानंतर या परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असल्याने नागरिकसुध्दा आश्चर्यचकित झाले आहेत. अतिसंवेदनशील दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कमलापूर परिसर मोडतो. आजपर्यंत या भागात विकासाची कामे झाली नाही. अनेक गावांना जाण्यासाठी रस्ता सुध्दा नसल्याने स्थानिक जनतेमध्ये शासन व प्रशासनाविषयी नैराश्येची भावना निर्माण झाली होती. मात्र यावर्षी अनेक विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. राजाराम-कमलापूर मार्गावर पूल नसल्याने राजाराम परिसरातील खांदला, रायगट्टा, मरनेली, गोलाकर्जी, निमलगुडम, तिमरम येथील नागरिकांना कमलापूर येथे येण्यास अडचण निर्माण होत होती. कमलापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, वन परिक्षेत्राधिकारी कार्यालय व डाकघर व आठवडी बाजाराची सुविधा असल्याने या परिसरातील नागरिकांना नेहमीच या ठिकाणी यावे लागत होते. मात्र पुलाअभावी मार्ग बंद राहत असल्याने मोठी अडचण निर्माण होत होती. दळणवळणाचे साधन उपलब्ध नसल्याने अडचण आणखी वाढत होती. यावर्षी सूर्यापल्ली नाल्यावरचा पूल बांधून पूर्ण झाला. त्यामुळे या मार्गावरून महामंडळाची बसही सुरू होण्याची शक्यता आहे. रेपनपल्ली ते छल्लेवाडा रस्त्याचे कामही जवळपास अर्धे झाले आहे. निधीच्या अभावामुळे काम बंद असले तरी निधी प्राप्त झाल्यानंतर काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. ग्रामपंचायती अंतर्गत विविध योजनांमधून कमलापूर तसेच इतर गावांमध्ये रस्ता व नाली बांधकामाची कामे सुरू आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील नागरिकांच्या विकासाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कमलापूर क्षेत्रात नक्षलवाद्यांचा प्रभाव असल्याने व अनेक एसपीओ तसेच राजकीय व्यक्तींची हत्या केल्याने नक्षलवादामुळे या भागाचा विकास रखडला असल्याची बोंब उठविण्यात आली होती. मात्र सद्य:स्थितीत अनेक विकासकामे सुरू असतानाही नक्षल्यांनी विरोध केल्याची एकही घटना आजपर्यंत घडलेली नाही. ते काहीही असले तरी या परिसरात विकासकामे केली जात आहेत.
कमलापूर परिसरातील गावांमध्ये विकासगंगा
By admin | Published: July 17, 2016 1:08 AM