लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : उन्हाळ्यात जंगलात वणवा लागत असल्याने मोठ्या प्रमाणावर वन संपत्ती जळून खाक होते. यात अनेक जीवांचाही होरपळून मृत्यू होतो. वणव्यामुळे पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणावर हानी होते. यावर पायबंद घालण्यासाठी तसेच उपाययोजना करण्यासाठी तालुक्यातील इरपनार येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गुरूवारी ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेत जंगल वाचविण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविण्यात आले.तेंदूपत्ता हंगामात खूट कटाईच्या वेळी तसेच मोहफूल गोळा करण्याच्या दृष्टीने झाडाखाली आग लावली जाते. आगीचे रूपांतर वणव्यात होऊन सर्वदूर ही आग पसरते. आगीत मोठ्या प्रमाणावर मोल्यवान वनस्पती नष्ट होते. वातावरण व पर्यावरणावर विपरित परिणाम होऊन प्रदूषण वाढते. इरपनार परिसरात आग लागू नये, यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगून वन संरक्षणाची जबाबदारी आपली आहे, असे समजून काम करावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना केले. यावेळी मल्लमपोडूरचे ग्रा.पं.सदस्य तथा माजी सरपंच सुधाकर तिम्मा, तिरसा वाकले गावडे, गंगा मडावी, मुरा वड्डे, कन्ना मडावी, सीताराम गावडे, विनोद मडावी, रघुनाथ गावडे, कमलशाह सडमेक, विलास गावडे, बारिकराव मडावी, सुधाकर तिम्मा, पोचा मडावी, कमला गावडे, वनिता सडमेक, यशोधा गावडे, बिट वनरक्षक महेश पिंपळे, टी.एस.भांडारे उपस्थत होते.अशी करणार उपाययोजनागावातील कोणतीही व्यक्ती अवैध वृक्षतोड करणार नाही, तसेच नवीन अतिक्रमण करणार नाही, तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात आग लावणार नाही. जंगलातील वणवा थांबविण्यासाठी प्रयत्न करणे, यासह विविध उपाययोजना करून जंगल वाचविण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.