निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी आहे. गावागावात महिला संघटना आहेत व त्यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याच्या बहुतेक गावात दारूबंदी चांगल्या रितीने लागू आहे. मात्र, शेजारी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठविण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात शासनाने दारू विक्री सुरू करू नये तर, दारूबंदी मजबूत केली पाहिजे असे आम्हांला वाटते. चंद्रपूरमध्ये जर दारूविक्री सुरू झाली तर गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू येऊन त्याचा उलट परिणाम होईल. जिल्ह्याच्या सीमेवर दुकाने सुरू होतील. गडचिरोली जिल्ह्याच्या प्रभावी दारूबंदीला धक्का बसेल. महिलांवर हा मोठा अन्याय होईल. चंद्रपूरच्या दारूविक्रेत्यांची घरे भरतील पण, आमचे संसार नष्ट होतील.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी कायम राहावी. गडचिरोली व चंद्रपूर दोन्ही जिल्ह्यांतील दारूबंदीची अंमलबजावणी कडक करण्यात यावी. अवैध दारूचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाच्या आवश्यक विभागांना जबाबदारी देण्यात यावी. चंद्रपूर जिल्ह्यातून कोणतीही अवैध दारू गडचिरोली जिल्ह्यात येणार नाही याची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशीही मागणी सिरोंचातील महिलांनी पाठविलेल्या निरोपातून केली आहे.