गडचिरोली : नक्षली चळवळीत ११ निरपराध व्यक्तींचा बळी घेणाऱ्या, पोलिसांविरुध्दच्या चकमकीत सहभागी होऊन अनेक हिंसक कारवाया करणाऱ्या छत्तीसगडच्या दोन नक्षल्यांनी २३ जुलै रोजी आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे त्या दोघांवर मिळून शासनाने एकूण आठ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षली सप्ताह होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचे हे मोठे यश असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी म्हटले आहे.अडमा जोगा मडावी (२६,रा.जिलोरगडा पामेड ता. उसूर जि.बिजापूर , छत्तीसगड), टुगे कारु वड्डे (३५,रा.कवंडे बेद्रे ता.बैरामगड जि.बिजापूर छत्तीसगड) असे या दुकलीचे नाव आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. अपर अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता उपस्थित होते.
मडावी हा २०१४ मध्ये एलजीएस या नक्षली दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला होता. २०२१ पर्यंत तो कार्यरत होता. त्यानंतर झोन ॲक्शन टीममध्ये बदली होऊन त्याने जून २०२३ मध्ये दलम सोडून घरी परतणे पसंत केले. वड्डे हा २०१२ मध्ये जाटपूर दलममध्ये जनमिलीशीय सदस्य पदावर भरती झाला व २०२३ पर्यंत कार्यरत राहून नंतर दलम सोडली. अडमा मडावीवर पाच खुनांसह चकमकीचे आठ, जाळपोळचा एक व इतर दोन गुन्हे नोंद आहेत तर टुगे वड्डेवर सहा खुनांचा आरोप असून जाळपोळीचा एक गुन्हा नोंद आहे. मडावीवर राज्य शासनाने सहा लाखांचे तर वड्डेवर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मडावी याने लाहेरी व वड्डे याने भामरागड पोलिसांना संपर्क करुन आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पणानंतर दोघांनाही लाखोंचे बक्षीसदरम्यान, नक्षली चळवळीतून बाहेर पडून सामान्य जीवन जगू पाहणाऱ्यांना शासनाने आत्मसमर्पण योजना २००५ मध्ये सुरु केली आहे. या योजनेंतर्गत मडावी यास साडेचार लाख रुपये तर वड्डे याला चार लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यातून दोघांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार आहे.
...म्हणून केले आत्मसमर्पणदलममध्ये पैसे गोळा करावे लागतात, वरिष्ट कॅडरचे माओवादी हा पैसा स्वत:चा वापरतात. विवाह करुनही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. आदिवासी युवक- युवतींचा माओवादी स्वत:साठी वापर करुन घेतात, नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलात वावरणे कठीण होते. दलममध्ये उच्चपदावर जाण्याची संधी मिळत नाही. याउलट पोलिसांच्या आत्मसमर्पण योजनेमुळे सामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगता येते, शिवाय सर्व गुन्हेही माफ होतात, त्यामुळे या नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. दरम्यान, नक्षली सप्ताहाच्या तोंडावर दोघांच्या आत्मसमर्पण झाल्याने नक्षली चळवळीला हा मोठा धक्का मानला जात आहे.