गडचिराेली : कुरखेडा येथील सती नदीच्या कुंभीटोला घाटावर १७ ऑगस्ट राेजी रोजी पूर्ण विकसित नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळून आले हाेते. या प्रकरणाचा छडा लावण्याचे पाेलिसांसमाेर आव्हान हाेते; परंतु पाेलिसांनी सखाेल चाैकशी करून अखेर प्रकरणाचे बिंग फाेडले. अनैतिक संबंधातून मूल जन्माला आल्यानंतर आपली बदनामी हाेईल, याच भावनेतून नवजात अर्भकाची विल्हेवाट लावण्यात आली. यासाठी कुमारी मातेला तिच्या आईसह अन्य दाेन युवकांनी मदत केली. यातील सर्व आराेपींना पाेलिसांनी अटक केली.
नवजात अर्भकाची विल्हेवाट लावण्यासाठी कुमारी माता चांदनी मेश्राम (२२) हिला तिची आई मंदाबाई मेश्राम (४८), दिलीप राेकडे दाेघेही रा. कुरखेडा, संतोष हर्षे (२८) रा. गिलगाव ता. जि. गडचिरोली आदींनी मदत केली हाेती. अर्भक आढळल्यानंतर पाेलिसांना कुणकुण लागताच मंदाबाई मेश्राम यांना अटक करण्यात आली. सध्या मंदाबाईची रवानगी चंद्रपूरच्या कारागृहात केली आहे. नवजात अर्भकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याला संतोष हर्षे व दिलीप रोकडे यांनी सहकार्य केले, असे चांदनीने सांगितले. त्यामुळे चारही आराेपींविराेधात भादंवि कलम ३१५, ३१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही आरोपीना न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. घटनेचा अधिक तपास ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे करीत आहेत.
१५ दिवस पाेलिसांना गुंगारा
नवजात अर्भक प्रकरणातील मुख्य आरोपी कुमारी माता चांदनी मेश्राम ही घटनेच्या दिवसापासून फरार होती. पोलिस तिच्या मागावर होते; परंतु १५ दिवसांपासून ती पोलिसाना गुंगारा देत हाेती. त्यामुळे तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर पोलिसांनी शुक्रवारी तिच्यासह दाेन युवकांना गडचिराेली तालुक्यातून अटक केली.