लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याचे सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी रविवारी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी वसतिगृहाच्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी त्यांच्यासोबत खासदार अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड आदी उपस्थित होते.राज्यमंत्री परीणय फुके यांनी मुलांच्या शासकीय आदिवासी वसतिगृहाला भेट देऊन तेथील अभ्यासिका, संगणक कक्ष, ग्रंथालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व व्यवस्थेबाबत विचारपूस केली. त्यानंतर राज्यमंत्री यांनी मुलींच्या शासकीय आदिवासी वसतिगृहाला भेट दिली. त्या ठिकाणी डीबीटीबाबत मुलींशी चर्चा केली, त्यांची राहण्याची व्यवस्था व त्याठिकाणी अस्तित्वात असलेले २००० पुस्तकांचे नव्याने तयार केलेल्या ग्रंथालय़ालाही भेट दिली. गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठे हे मुलींचे आदिवासी वस्तीगृह आहे. याठिकाणी ३२० मुलींसाठी राहण्याची व्यवस्था होईल, एवढी प्रशस्त इमारत असून मुलींना राहण्यासाठी चांगल्या प्रकारे शासनाकडून त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यमंत्र्यांनी यावेळी इंदुराणी जाखड प्रकल्पाधिकारी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी वंदना महल्ले, अनिल सोमनकर यांनी मंत्र्यांना वसतिगृहाबद्दल सविस्तर माहिती दिली. गृहपाल स्वाती पांडे यांनी आधुनिक ग्रंथालयाबाबत राज्यमंत्र्यांना माहिती दिली. तसेच मुलांच्या वसतिगृबाबत अधीक्षक रविंद्र गजभिये यांनी माहिती दिली. यावेळी गृहपाल मुकेश गेडाम यांनी सहकार्य केले. याप्रसंगी ना.फुके यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या खर्रामुक्त अभियानाचे कौतुक केले.
आदिवासी विकास मंत्र्यांची वसतिगृहाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 12:42 AM