लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : मुस्लीम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याच्या पर्वावर देसाईगंज शहरात मेवा व सेवयांचे दुकान सजले आहेत. मात्र वाढत्या महागाईमुळे बाजारातील मेवा खरेदीला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या तुलनेत मेव्याचे दर वाढले आहेत. मात्र अशा परिस्थितीतही मुस्लिम बांधव या पदार्थांची खरेदी करीत आहेत. २६ जून रोजी मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा रमजान ईद हा सण आहे. या दिवशी मुस्लिम बांधवांकडून बाजारातील मेवा व सेवयांची खरेदी मोठ्या प्रमाणात होणार आहे. एकमेकांना शुभेच्छा देऊन शिरखुरमा सेवन केले जाते. या सणांमुळे मुस्लिम बांधवात स्नेह निर्माण होत असते. ३० दिवस रोजा (उपवास) ठेवल्यानंतर मुस्लिम समाजात रमजान सण साजरा केला जातो. या काळात सर्व मुस्लिम बांधव इदगाहमध्ये जमा होऊन नमाज अदा करतात. रमजान महिन्याच्या पर्वावर गडचिरोली, आरमोरी व अहेरी, आलापल्ली शहरातील दुकाने मेवा व सेवयाने सजली आहेत. मुस्लिम बांधवांच्या या सणात इतर समाजाचे लोकही सहभागी होतात.
वडसात मेवा व सेवयांचे दुकान सजले
By admin | Published: June 19, 2017 1:43 AM