आनंदीबाई जोशी पुरस्कार : किशोर वाघ, सातमवार, बंडगर, ढगे, हेमनानी यांचा गौरव गडचिरोली : सन २०१५-१६ या वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्र व तीन उपकेंद्रांना डॉ. आनंदाबाई जोशी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. संबंधित आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना हा पुरस्कार देऊन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट काम करणाऱ्या अंकिसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह व २५ हजार रूपयांचा धनादेश देऊन प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र वडधाला प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह व १५ हजार रूपयांचा धनादेश देऊन द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र मालेवाडाला प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह व १० हजार रूपयांचा धनादेश देऊन तृतीय पुरस्काराने गौरविण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल याप्रसंगी म्हणाले की, जिल्ह्यातील माता मृत्यू, बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याची गरज आहे. या दृष्टिकोनातून विविध योजना व सुविधांची माहिती रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, क्षयरोग अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. अनुपम महेशगौरी आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
वडधा, अंकिसा, मालेवाडा आरोग्य केंद्र सन्मानित
By admin | Published: March 16, 2017 1:16 AM