सिराेंचा तालुका मुख्यालयापासून ४५ किमी अंतरावर काेपेला हे गाव आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ पासून हे गाव पाच किमी अंतरावर आहे. या गावात पक्के रस्ते व नाले नाहीत. येथे राज्य परिवहन महामंडळाची बसफेरीसुद्धा नाही. आवश्यक कामासाठी नागरिकांना स्वत:ची दुचाकी, सायकल किंवा पायी प्रवास करावा लागताे. येथे आराेग्याच्या अनेक समस्या आहेत. गावालगत एक नाला आहे. पावसाळ्यात येथून रहदारी बंद हाेते. परिसरातील जमीनसुद्धा दगडयुक्त असल्याने याेग्यप्रकारे पीकसुद्धा घेता येत नाही. वनविकास महामंडळ व वन विभागाच्या मजुरीवरच अनेक नागरिक उदरनिर्वाह करतात. काही लाेक कामासाठी तेलंगणात जातात.
गावात अंगणवाडी व इयत्ता चाैथीपर्यंत शाळा आहे. परिसरात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण नसल्याने तालुका मुख्यालयात जावे लागते. गावात आराेग्य पथक आहे; परंतु इमारतीत काेणतेही आराेग्य कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. आराेग्य सेविका झिंगानूर प्राथमिक आराेग्य केंद्रात राहून सेवा देतात. गावातील आराेग्याचे काम आशावर्कर सांभाळते. दाेन वर्षांपूर्वी एका गराेदर महिलेला खासगी वाहनाने रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच प्रसूती झाली. मात्र, दुर्दैवाने बाळ दगावले. ये-जा करण्यास याेग्य रस्ता नसल्याने हा प्रसंग ओढवला. त्यामुळे या भागातील नागरिक पक्के रस्ते, नाले व अन्य मूलभूत साेयी पुरविण्याची मागणी करीत आहेत; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते.