विश्रामगृहाची मागणी प्रलंबितच
कोरची : कोरची तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक विस्तारित क्षेत्राचा विचार करून कोरची येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली. लहान सहान बैठका आयाेजित करण्यासाठी विश्रामगृह गरजेचे आहे.
शासकीय विहिरीवर खासगी पंपांचा कब्जा
धानाेरा : तालुक्यातील अनेक शासकीय विहिरींवर खासगी पाणी पंप लावण्यात आले आहेत. मात्र, याबाबत ग्रामीण भागातील नागरिक तक्रार करीत नाही. ग्रामपंचायतीने स्वत: दखल घेऊन अशा प्रकारच्या अवैध मोटार काढणे आवश्यक असतानाही दुर्लक्ष आहे. कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
पट्टेवाटपासाठी अट शिथिल करा
गडचिरोली : गैर आदिवासी नागरिकांना वन पट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. ही अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारमार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र, ७५ वर्षांची अट असल्याने अनेक दावे प्रलंबित आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी हाेत आहे.
रेगडी येथे बँक शाखा सुरू करा
घोट : घोटपासून १५ किमी अंतरावर असलेल्या रेगडी येथे बँक शाखा स्थापना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रेगडी परिसरात २५ ते ३० गावांचा समावेश आहे, शिवाय येथे पोलीस मदत केंद्र, शासकीय आश्रमशाळा, धर्मराव हायस्कूल, जि. प. उच्च प्राथमिक शाळा, शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. रेगडी येथे बँक शाखा सुरू झाल्यास अनेकांना साेयीचे हाेईल.
अनेक वाॅर्डातील नाल्यांची दुरवस्था
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत, शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात. नगरपरिषदेने नियाेजन करून नाल्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी हाेत आहे.
मोहलीचा मनाेरा ठरताेय कुचकामी
धानोरा : तालुक्यातील मोहली बीएसएनएलचा मनोरा आहे, परंतु त्याची क्षमता कमी असल्याने दुर्गम परिसरातील ग्राहकांना याचा लाभ होत नाही. मोहली, दुधमाळा, गिरोला, गोडलवाही, आदी ठिकाणी भ्रमणध्वनी मनोरे नाहीत. त्यामुळे मोहली येथील मनोऱ्यांची रेंज वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मामीडीताेगूजवळ पूल बांधण्याची मागणी
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामीडीतोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे.
त्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा
चामोर्शी : तालुक्यातील भिवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)- नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने या मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पुलाअभावी वाहतूक होते वारंवार प्रभावित
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र, या नाल्यावर अद्यापही पुलाचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातून आवागमन करावे लागते. मात्र, या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष आहे.