निधीचा अभाव : आपातग्रस्तांना ४४ लाखांची मदत बाकी गडचिरोली : सन २०१६ च्या पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली. जनावरांच्या गोठ्यांची पडझड झाली तसेच काही व्यक्ती जखमीही झाले. अशा आपद्ग्रस्त नागरिकांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत १ कोटी १२ लाख ६५ हजार ९९० रूपयांची मदत आपद्ग्रस्तांना दिली आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील अनेक आपातग्रस्तांना ४४ लाख ९४ हजार ४९५ रूपयांची मदत देणे बाकी आहे. राज्य शासनाकडून मदत देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात न आल्याने अनेक आपद्ग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेतच आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात तीन ते चारदा अतिवृष्टी झाली. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील अनेक नद्या, नाल्यांना पूर आला. तलावही तुडूंब भरल्याने नुकसान झाले. गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण १६ व्यक्तींचा मृत्यू झाला. तर १७ इसम जखमी झाले. १६ मृतकांच्या कुटुंबीयांना ६४ लाख व १७ जखमींना ९८ हजार ३०० रूपयांची मदत देण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्हाभरात एकूण ७८, मोठी जनावरे दगावली. संबंधित जनावर मालकांना नुकसानीच्या आकडेवारीनुसार १७ लाख ७२ हजार रूपयांची मदत जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमुळे २ हजार ७९८ घरांची अंशत: तर आठ घरांची पूर्णत: पडझड झाली. अंशत: पडझड झालेल्या सर्व घर मालकांचे ६९ लाख ७८ हजार ५३५ रूपयांचे नुकसान झाले. तर घराची पूर्णत: पडझड झालेल्या आठ कुटुंबधारकांचे ५८ हजार ९०० रूपयांचे नुकसान झाले. यापैकी प्रशासनाने आतापर्यंत घरांची अंशत: पडझड झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांना २६ लाख ४४ हजार १४० रूपयांची मदत दिली. तसेच घराची पूर्णत: पडझड झालेल्या चार आपद्ग्रस्तांना २० हजार ८०० रूपयांची मदत दिली. नैसर्गिक आपत्तीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात जनावरांच्या १३५ गोठ्यांची पडझड झाली. यामुळे २ लाख २२ हजार ७५० रूपयांचे नुकसान संबंधित जनावर मालकांचे झाले. यापैकी ५० गोठ्यांच्या नुकसानीबाबत संबंधित आपद्ग्रस्तांना १ लाख ७५० रूपयांची मदत देण्यात आली. मात्र अद्यापही अनेक पशुपालक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी) दीड हजारावर आपातग्रस्त अडचणीत पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांची अशंत: पडझड झाली तर काही घरांची पूर्णत: पडझड झाली. जनावरांच्या गोठ्यांचीही पडझड झाली. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र अद्यापही घरांची अंशत: पडझड झालेल्या १ हजार ५१४, पूर्णत: पडझड झालेल्या ४ व गोठ्यांची पडझड झालेल्या ८५ अशा एकूण दीड हजारावर आपातग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली नाही. हे सर्व जण तहसील कार्यालयात जाऊन मदतीच्या रकमेबाबत विचारणा करीत आहेत. अडीच महिने उलटले नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या आपातग्रस्तांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निधी प्राप्त झाला होता. मात्र सदर निधी सप्टेंबरअखेर संपला. त्यानंतर राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला निधी मिळाला नाही. अडीच महिन्यांपासून मदतीच्या निधीचा अभाव आहे.
मदतीची प्रतीक्षाच
By admin | Published: January 03, 2017 12:49 AM