देसाईगंज : शहराच्या मुख्य मार्गावर असलेल्या जुन्या बसस्थानकावर महामंडळाची व खासगी वाहने उभी करण्यासाठी जागा उरत नाही. शिवाय दुकानदारांचे अतिक्रमण वाढल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी येथे वाहतुकीच्या काेंडीचा प्रश्न जटिल झाला आहे. दुसरीकडे नव्या बसस्थानकनिर्मितीचा प्रश्न कायम आहे.
येथे नवीन बसस्थानकाचे बांधकाम केव्हा हाेणार, याची प्रतीक्षा नागरिकांना आहे. येथे कित्येक वर्षांपासून मुख्य महामार्गावर असलेले बसस्थानक या ठिकाणी असल्याने नेहमीच वाहतुकीची कोंडी हाेते. त्यातच परिवहन महामंडळाने बसफेऱ्या कमी झाल्याने या परिसरात रोजच प्रवाशांची गर्दी असते. येथे मुख्य बाजारपेठ असून, दिवसेंदिवस शहराची लाेकसंख्या वाढत आहे. वाहनांची संख्या दुपटीने वाढल्याने रस्ते कमी पडत आहेत. वर्दळीचे प्रमाण वाढले असून, अनेक ठिकाणी वाहतुकीची काेंडी हाेत आहे. येथे नवीन बसस्थानक निर्मितीचा तिढा अजूनही कायम आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.