.
याेजना शेकडाे, मात्र प्रत्यक्ष लाभ मिळेना
एटापल्ली: पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीक विमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. मात्र, अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने, गरीब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अतिक्रमणामुळे गडचिराेलीतील रस्ते झाले अरुंद
गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडी बाजाराच्या दिवशी रविवारी या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. अतिक्रमणाची समस्या गंभीर झाली असून, अतिक्रमण हटविण्याची मागणी आहे.
दारू पिऊन वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले
गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी, तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक, तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने मागणी करूनही मद्यपी वाहन चालकांवर कारवाई नाही. चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरू झाल्यापासून दारू पिऊन वाहने चालविण्याचे प्रमाण वाढले आहे.