लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुका मुख्यालयाला लागून असलेल्या पर्लकोटा नदीवर उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात भामरागडचा संपर्क तुटून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.भामरागड तालुका मुख्यालयालयाला लागूनच पर्लकोटा नदी आहे. या नदीलगतच त्रिवेणी संगम आहे. त्यामुळे पावसाळ्यात तिन्ही नद्या भरल्यानंतर पर्लकोटा नदीला मोठ्या प्रमाणावर दाब येतो. या नद्यातील पूर ओसरल्याशिवाय पर्लकोटा नदीतील पाण्याची पातळी कमी होत नाही. परिणामी अनेकदा दोन ते तीन दिवस वाहतूक ठप्प होते. कमी उंचीचा पूल असल्याने ही समस्या दरवर्षी निर्माण होते. या नदीवर उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. अनेक विभागाचे मंत्री भामरागड येथे दौरे करून पुलाची उंची वाढविण्याचे आश्वासन देतात. परंतु मागणीकडे दुर्लक्ष होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या नदीवर उंच पुलाचे बांधकाम करण्याचे आश्वासन पाच ते सहा वर्षांपूर्वी दिले होते. परंतु आश्वासन पूर्ण झाले नाही.पावसाळ्यात भामरागड तालुक्यातील १५० गावांचा संपर्क तुटतो. परिणामी अनेक गावातील स्वस्त धान्य दुकानांना दोन ते तीन महिन्यांचे धान्य पावसाळ्यात सुरू होण्यापूर्वीच पुरविले जाते. पावसाळ्यात अनेक गावांमध्ये पक्क्या रस्त्याअभावी जात येत नाही. त्यामुळे नागरिक जून, जुलै महिन्यातच दैनंदिन गरजेच्या वस्तूंची सोय करून ठेवतात. पावसाळ्यात रुग्णांना जिल्हास्तरावर उपचारार्थ भरती करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे पर्लकोटा नदीवर उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.
पर्लकोटा नदीवर उंच पुलाची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 12:11 AM
भामरागड तालुका मुख्यालयाला लागून असलेल्या पर्लकोटा नदीवर उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात भामरागडचा संपर्क तुटून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
ठळक मुद्देमागणीकडे दुर्लक्ष : पावसाळ्यात वारंवार तुटतो भामरागडचा संपर्क